मुंबई : दृष्टीहीन, अंध व्यक्तींना चलनातील नोटा ओळखणे सोईस्कर व्हावे यासाठी नोटांमध्ये अनेक स्पर्शज्ञान देणारी वैशिष्ट्ये (Tactile Features) समाविष्ट केली आहेत, अशी माहिती सोमवारी रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.
चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे हायकोर्टाने आरबीआयला आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आयबीआयकडून ऍप्लिकेशन विकसित केले आहे. जे दृष्टिहीन लोक वापरू शकतात, असे ऍड. उदय वारुंजीकर यांनी बाजू मांडताना सांगितले. तर ऍपसह आरबीआयने दृष्टिहीन लोकांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांशीही सल्लामसलत केली असल्याची माहिती आरबीआयच्या वतीने ज्येष्ठ ऍड. व्यंकटेश धोंड यांनी दिली.
नोटांमध्ये स्पर्शज्ञान देणारी वैशिष्ट्ये
आरबीआयने चलनी नोटांमध्ये दृष्टीहीन व्यक्तींना नोटा ओळखण्यासाठी चिन्हे आणि रेषांसह अनेक स्पर्शज्ञान वैशिष्ट्ये विकसित केली आहेत. १०० रुपयांच्या नोटेमध्ये त्रिकोण आणि चार रेषा आहेत. ५०० रुपयांच्या नोटांमध्ये वर्तुळ आणि पाच रेषा आहेत. २००० रुपयांच्या नोटेमध्ये आयत आणि सात ओळींचा समावेश असल्याची माहितीही धोंड यांनी खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत याचिकेत उपस्थित केलेल्या अन्य समस्या गंभीर आहेत. त्याबाबत याचिकाकर्त्यांना उपाययोजना आणि शिफारसी प्रतिज्ञापत्रावर सुचविण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.