फोटो सौजन्य - Social Media
वाशिम नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उपाध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेबाबतची उत्सुकता अखेर मंगळवारी (दि. १३) संपुष्टात आली. या निवड प्रक्रियेत अनपेक्षित घडामोड घडत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजू भांदूर्गे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निकालानंतर भाजप आणि उबाठा गटात उपाध्यक्षपदाची निवड परस्पर संमतीने ठरवून केल्याच्या चर्चांना जोर आला आहे. अशातच आता नगरपालिकेतील स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
वाशिम नगरपालिकेच्या ३२ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने १४ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भाजपच्या विचारसरणीशी जवळीक असलेला एक सदस्य अपक्ष म्हणून निवडून आला आहे. दुसरीकडे उबाठा गटाला १३ जागा मिळाल्या असून, मित्र पक्ष काँग्रेसचे २ आणि एमआयएमचेही २ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी (मविआ) यांचे संख्याबळ जवळपास समान झाले आहे.
या राजकीय समीकरणांमध्ये एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यास समसमान मतांच्या स्थितीत अध्यक्षांचा निर्णायक मतदानाचा हक्क लागू होणार होता. त्यामुळे उपाध्यक्षपदावर भाजपचे पारडे जड राहील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपकडून उपाध्यक्षपदासाठी उमेदवारीच दाखल न केल्याने उबाठाचे राजू भांदूर्गे बिनविरोध निवडून आले. या निर्णयामुळे भाजप व उबाठा गटामध्ये काही तरी राजकीय तडजोड झाली असावी, अशा चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, स्वीकृत सदस्यांच्या निवडीतही भाजपचे गणेश खंडाळकर आणि निलेश जीवनानी, तसेच उबाठा गटाच्या रेखा सुरेश मापारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हेच पक्ष निवड प्रक्रियेत मात्र सौहार्दाने निर्णय घेत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे या निवडीमागे नेमकी कोणती राजकीय रणनीती होती, याबाबत वाशिमकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
आता नगरपालिकेतील स्थायी समितीसह आरोग्य, बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा आदी विषय समित्यांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. विशेष म्हणजे उबाठा गटात सभापतीपदासाठी फारशी चढाओढ दिसून येत नसली, तरी भाजपमध्ये मात्र अनेक नवे-जुने चेहरे निवडून आल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजपमध्ये सभापतीपदासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थायी व विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीत भाजप आणि उबाठा गट कोणता फॉर्म्युला वापरतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांकडून पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनधरणी सुरू असून, आगामी काही दिवसांत नगरपरिषदेतील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






