खुलताबाद पंचायत समितीत 'अजब' युती; भाजपचा सभापती तर ठाकरे गटाचा उपसभापती
खुलताबाद पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या सुनीता खंडागळे यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीत ठाकरे गटानेच भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने त्यांची निवड सहज झाली. सत्ता स्थापनेत उपसभापतीपद ठाकरे गटाच्या वाट्याला आले. ठाकरे गटाच्या मंदाबाई बद्रीनाथ वाकळे यांना उपसभापतीपद देण्यात आले.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीचा संघर्ष असतानाही खुलताबादमध्ये स्थानिक पातळीवरील प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी किंवा सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या ‘अजब’ युतीमुळे केवळ स्थानिक नेतेच नव्हे, तर विरोधकही चक्रावून गेले आहेत.
पुणेकरांनो, थकीत प्रॉपर्टी टॅक्स लवकर भरा; अन्यथा कडक कारवाई केली जाणार
पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नेते एकमेकांवर विखारी टीका करत असताना, खुलताबादमध्ये मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन जल्लोष करताना दिसले. स्थानिक पातळीवरील प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी आणि सत्तेचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या अनपेक्षित युतीमुळे राजकीय विश्लेषकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
खुलताबादमधील या नव्या समीकरणामुळे इतर स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे. या युतीचा थेट परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण ही युती केवळ या विशिष्ट निवडणुकीपुरती मर्यादित आहे की आगामी नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हा ‘खुलताबाद पॅटर्न’ पाहायला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






