अमरावती : हत्या प्रकरणातील एका आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (District and Sessions Judge) रविंद्र एम. जोशी (Ravindra M. Joshi ) यांच्या न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा (Life imprisonment) व १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. संदिप मधुकर तायडे (४०, रा. धामणगाव, ता. मोर्शी, जि. अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शिरखेड पोलीस ठाण्याच्या (Shirkhed Police Station) हद्दीतील धामणगाव (Dhamangaon) शिवारात १२ जानेवारी २०१७ रोजी घडली होती.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून केली होती हत्या
विधी सुत्रानुसार, धामणगाव येथील रहिवासी दिलीप देविदास निमकरडे (४५) हे १२ जानेवारी २०१७ रोजी गावातील वृध्द व्यक्ती देविदास अडायके यांच्या अंत्यविधीकरीता विश्वासराव देशमुख यांच्या शेतात गेले होते. त्यावेळी अंत्यविधीकरिता खड्डा खोदायला आलेला संदिप मधुकर तायडे हा हातात सब्बल घेऊन दिलीप यांच्या अंगावर धाऊन आला. त्याने दिलीप यांच्या डोक्यावर सब्बल मारला. त्यावेळी तेथे उपस्थित निलेश निमकरडे यांनी संदिप तायडेला बाजुला केले. त्यानंतर संदिप हा सब्बल घेऊन पसार झाला. त्यानंतर दिलीप यांना नागरिकांनी ऑटोत टाकले. दरम्यान प्रत्यक्षदर्शी व निलेश निमकरडे हे दोघेही दिलीप यांच्या घरी गेले आणि त्यांनी या घटनेची माहिती दिलीप यांच्या पत्नीला दिली.
त्यानंतर ते सर्व लगेच दिलीप यांना घेऊन रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. त्यावेळी दिलीप यांनी पत्नीस सांगितले की, माझे व संदिपची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय संदिपला होता. त्याने यापूर्वीही दोन ते तीन वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याची समजूत काढल्यानंतरही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर दिलीप यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना डॉ. सावेदकर यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर दिलीप यांची पत्नी वंदना निमकरडे यांनी या घटनेची तक्रार शिरखेड पोलीस ठाण्यात नोंदविली.
दरम्यान १३ जानेवारी २०१७ रोजी दिलीप यांचा उचचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात भादंविची कलम ३०२ वाढविली. या गुन्ह्यात तपास पूर्ण करून शिरखेड पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता परीक्षित शरद गणोरकर यांनी दोषसिध्द करण्याकरिता एकूण नऊ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्ती वादानंतर आरोपीचा दोष सिध्द झाला. न्यायालयाने आरोपी संदीप तायडेला आजीवन कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणाचा तपास एपीआय सचिन तायवाडे यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून शिरखेड ठाण्यातील पोलीस नाईक ममता चौव्हाण यांनी कामकाज पाहिले.