सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला दाऊद इब्राहिम टोळीकडून धोका; कुटूंबियांनी केली 'ही' मागणी (फोटो सौजन्य - pinterest)
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या घरावर काही महिन्यांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या दोन सदस्यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपींना अटक केली होती. हे आरोपी सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत. मात्र हे आरोपी ज्या तुरुंगात आहेत, त्याच ठिकाणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचे सदस्य देखील आहेत. या सदस्यांना इतर काही प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- धक्कादायक! हॉटस्पॉट देण्यास नकार, रागात केली मॅनेजरची हत्या; एकाला अटक
दाऊद इब्राहिम टोळीचे सदस्य विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपींना त्रास देत असून त्यांना जीवे मारण्याचा कट रचत आहेत, असा दावा आरोपींच्या कुटूंबियांनी केला आहे. याप्रकरणी आरोपीच्या भावाने सरकारला पत्र लिहून योग्य कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी विक्की गुप्ताचा भाऊ साहेब शाह गुप्ता त्याला तुरुंगात भेटायला गेला होता. यावेळी विक्कीने त्याच्या भावाला सांगितलं की, तुरूंगात असलेले दाऊद इब्राहिम टोळीचे सदस्य त्याला आणि सागर पालला त्रास देत आहेत आणि जिवे मारण्याची धमकी देत आहेत. यानंतर आरोपींच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र आणि बिहार सरकारला पत्र लिहून आरोपींच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपींच्या कुटूंबियांनी हाराष्ट्राचे डीजीपी, गृह मंत्रालय, तुरुंग अधीक्षक आणि बिहार सरकारला पत्र लिहीलं आहे. पत्रात म्हटलं आहे की, दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित सदस्यही याच तुरुंगात बंदिस्त असून, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणामुळे ते सर्वजण प्रचंड संतापले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
हेदेखील वाचा- छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेत उपमुख्यमंत्री फडणवीस केव्हा माफी मागणार? परशुराम उपरकर यांचा सवाल
पत्रात पुढे म्हटलं आहे की, सलमान खानने त्याचा आश्रयदाता दाऊद इब्राहिमच्या हितासाठी आपल्या प्रभावाचा वापर केला आहे आणि कोणत्याही योग्य प्रक्रियेचे पालन न करता तपास अधिकाऱ्याने आरोपपत्र दाखल केले आहे. आरोप पत्रात अतिरिक्त कलमे जोडण्यात आली आहेत. माध्यमांद्वारे तपासादरम्यान आरोपी अनुज थापन याचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याचे आम्हाला समजले. विकी गुप्ता आणि सागर पाल हे चांगले लोक आहेत आणि त्यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहे. आम्हाला तुरुंगात असलेल्या सलमान खानच्या साथीदारांमुळे विकी गुप्ता आणि सागर पाल यांच्या सुरक्षेची काळजी आहे. आम्ही तुम्हाला या प्रकरणी आवश्यक कारवाई करण्याची विनंती करतो.
या वर्षी 14 एप्रिल रोजी दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी वांद्रे भागातील अभिनेता सलमान खानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. या खळबळजनक घटनेनंतर विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांनाही गुजरातमधून अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी अनुज थापन (32) याला 26 एप्रिल रोजी पंजाबमधून अन्य एका व्यक्तीसह अटक करण्यात आली होती.
मात्र अनुज थापन हा गुन्हे शाखेच्या पोलीस लॉकअपच्या शौचालयात १ मे रोजी मृतावस्थेत आढळला होता. अनुज थापनने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे. तर त्याची आई रीता देवी यांनी ३ मे रोजी दाखल केलेल्या याचिकेत अनुज थापनचा खून झाल्याचा दावा केला होता. आता दाऊद इब्राहिमच्या टोळीमधील सदस्यांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना धमकी दिली आहे की त्यांची अवस्था देखीस अनुज थापनसारखी केली जाईल.