अभिनेता रणवीर सिंह नागपुरात; डॉ. मोहन भागवत यांची भेट घेत केली तासभर चर्चा
नागपूर : सुपरहिट ‘धुरंधर’ चित्रपटाचे अभिनेते रणवीर सिंह शुक्रवारी सायंकाळी अचानक महालातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले. त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन सुमारे तासभर बंदद्वार चर्चा केल्याची माहिती आहे. त्यांच्या अचानक भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, चित्रपटाच्या यशानंतर सौहार्दपूर्ण भेटीसाठी ते संघ मुख्यालयात आल्याचे सांगितले जात आहे.
धुरंधर सिनेमामधील जसे पाकिस्तानात जाऊनही कुणाला समजले नाही तसेच रणवीर सिंह नागपुरात पोहोचल्यानंतरही त्याची हवा कुणालाही शेवटपर्यंत नव्हती. त्यामुळेच नागपुरातही रणवीर सिंह धुरंधर ठरले, अशी चर्चा होती. रणवीर सिंह यांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन केले. नागपूरला येण्यापूर्वी ते जामनगर येथे अनंत अंबानी यांच्या वाढदिवसाच्या समारंभात सहभागी झाले होते. तेथूनच ते चार्टर विमानाने थेट संघभूमीत पोहोचले. त्यांच्या आगमनाची पूर्वसूचना विमानतळ प्राधिकरणाला होती.
‘धुरंधर’ प्रमाणे आले अन् गेले
रणवीर सिंह ‘धुरंधर’ चित्रपटानंतर देशभक्तीची प्रतिमा असलेले ‘जेन-झी’ आयकॉन म्हणून समोर आले आहे. ते सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता नागपूरमध्ये पोहोचले. पांढरा शर्ट आणि पँट परिधान करून ते मधल्या गाडीत मागील सीटवर बसलेले होते. महाल परिसरातील बडकस चौकातून सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांना दिसले. यानंतर ही बातमी वेगाने पसरली. मात्र, तोपर्यंत त्यांनी रात्री सुमारे ८ वाजता चार्टर विमानाने उड्डाण केले होते.
RSS सारखी संघटना कुठेही नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शताब्दी वर्षे सुरु आहे. संघ कार्याच्या या 100 वर्षांमध्ये अनेक समाजपयोगी कामे करण्यात आली आहे. यानिमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. याबाबत मोहन भागवत म्हणाले की, संघ कोणत्याही संघटनेशी स्पर्धा करण्यासाठी बाहेर पडलेला नाही. संघ कोणाचाही विरोध करण्यासाठी नाही. संघ सत्ता किंवा लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचे उद्दिष्ट देशात केले जाणारे सर्व चांगले काम कोणत्याही विरोधाशिवाय योग्यरित्या पार पाडणे आहे. संघ या दिशेने काम करत आहे.






