महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (फोटो- ट्विटर)
रानवली धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना
पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविणे आवश्यक – तटकरे
स्थानिक स्तरावर पाणी वितरणाचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश
मुंबई: श्रीवर्धन नगरपालिकाहद्दीतील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा व्हावा, यासाठी तातडीने कार्यवाही करावी. रानवली धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. श्रीवर्धन नगरपालिका हद्दीतील विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा नगरप्रशासन अधिकारी विराज लबडे, उपनगराध्यक्ष अनंत गुरव, मुख्याधिकारी राठोड तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी रानवली धरणातून आराठी, धोंड गल्ली आणि जीवना बंदर परिसरातील साठवण टाक्यांमध्ये पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, यामुळे नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी मिळण्यास मदत होईल आणि पाण्याचे समान वितरणही शक्य होईल.
श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयीन दालनात बैठक घेतली. श्रीवर्धन शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, ब्ल्यू फ्लॅग मानकांच्या धर्तीवर श्रीवर्धनच्या… pic.twitter.com/Rgkky4sBrz — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 9, 2026
पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर पाणी वितरणाचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
याशिवाय श्रीवर्धनच्या पर्यटनविकासाच्या दृष्टीनेही विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात. पर्यटनवाढीस चालना देणे, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखणे, पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या संधी निर्माण करणे, पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे यावर भर देण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
राज्यातील अंगणवाड्यांच्या संदर्भात, त्या एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत आहेत, ज्या ६ वर्षांखालील मुलांचे पोषण, आरोग्य आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात. याचदरम्यान आता महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ३१५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्रांमध्ये मुलांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.






