नेरळ ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी! (Photo Credit - X)
₹९० लाखांची थकबाकी: सवलत न देण्याचा निर्णय
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता धारकांकडे तब्बल ९० लाख रुपयांची घरपट्टी थकीत आहे. ग्रामसभेत थकीत घरपट्टी वसुलीबाबत चर्चा झाली. माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी ठराव मांडला की, थकीत घरपट्टीमध्ये कोणालाही सवलत देऊ नये आणि संपूर्ण थकबाकी वसुलीसाठी ठोस नियोजन जाहीर करावे. शासनाच्या नियमानुसार ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय ग्रामसभा घेऊ शकते, असा नियम असतानाही, ग्रामस्थांनी सवलत देण्यास विरोध दर्शवणारा ठराव बहुमताने हात उंचावून मंजूर केला. दिलीप बोरसे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. जानेवारी २०२६ पासून सर्व थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी संकलनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत हाती घेणार आहे.
१२ वर्षांनंतर पाणीपट्टी वाढ, नवीन दर ₹२१०
जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या पाण्याची करवाढ करण्याचा विषय ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी मांडला. बहुसंख्य ग्रामस्थांनी पाणीपट्टी वाढीला विरोध दर्शवला. सूर्यकांत चंचे, सावळाराम जाधव, अक्षय चव्हाण, ॲड. सुमित साबळे यांसह अनेकांनी “आधी दोनवेळ पुरेसे पाणी द्या आणि नंतरच पाणीपट्टी वाढवा,” अशी भूमिका घेतली. वादळी चर्चेनंतर अखेर मासिक पाणीपट्टी ₹२१० करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. नेरळ ग्रामपंचायतीने २०१३ मध्ये मासिक पाणीपट्टी ₹६० वरून ₹१२५ प्रति महिना केली होती. १२ वर्षांनंतर ही पाणीपट्टी वाढविण्यात आली असून, ती फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल. प्रशासक सुजित धनगर यांनी या काळात सर्व थकीत पाणीपट्टी वसुलीचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले.
रेल्वे भुयारी मार्गाचा ठराव मंजूर
या ग्रामसभेत नेरळ गावातून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या पाडा येथील फाटक बंद करण्याच्या रेल्वेच्या निर्णयावर चर्चा झाली. सूर्यकांत चंचे यांनी त्या ठिकाणी भुयारी मार्ग (Subway) बनवण्याचा ठराव मांडला, ज्याला सर्वांनी पाठिंबा दिला.






