पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्प जोमाने सुरु होणार; 609 कोटी 58 लाखांचा निधी मंजूर (File Photo : River)
कोल्हापूर : पुणे, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यंत सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली. पावसाच्या पुन्हा दमदार बॅटिंगमुळे पंचगंगेची पाणी पातळी अवघ्या १५ तासांत तब्बल साडेसहा फुटांनी वाढली. रात्री साडेआठच्या सुमारास पंचगंगा विहार मंडळाकडून पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर यायला सुरुवात झाली. रात्री १२ वाजता पाणी पातळी २८ फुटांवर गेली होती.
जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, साळवण, आंबा या गावांसह १२ धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात सकाळी जोरदार पाऊस झाला. यानंतर दुपारपर्यंत पावसाच्या हलकल्या सरींची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर काहीकाळ पावसाने उघडीप घेतली होती. पुन्हा पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात पावसाचा जोर होता. काही तालुक्यांत धुवाधार तर काही तालुक्यांत मध्यम सरी कोसळल्या.
जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने घाटमाथ्यावरून खाली येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. परिणामी, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा आपत्ती विभागाच्या अहवालानुसार पावसामुळे गेल्या २४ तासांत एका खासगी मालमत्तेचे नुकसान झाले. एक राज्यमार्ग व चार जिल्हा मार्गावर पाण्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने आहे.
राधानगरी धरण ८७ टक्के भरले
राधानगरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. धरण ८७ टक्के भरले असून, धरणातून ३१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. याशिवाय चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी हे सात धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून यातून एकूण १३ हजार ६३६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर तुळशी ८० टक्के, दूधगंगा ७२, कासारी ७४, कडवी ९६, कुंभी ७६, पाटगाव ९२, चिकोत्रा ८३ टक्के भरले असून आठ प्रकल्पांतून ३ हजार ५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण ८३ टक्के भरले असून सायंकाळी चार वाजता वक्र दरवाज्यातून सुरू असलेला विसर्ग वाढवून ८ हजार ५३० क्युसेक करण्यात आला.
१२ धरणक्षेत्रात अतिवृष्टी
राधानगरी, दूधगंगा, कासारी, कडी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, धामणी, कोदे या १२ महत्त्वाच्या धरण क्षेत्रांमध्ये गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली.