अहिल्यानगर शहरात दोन वेळा होणार स्वच्छता!
अहिल्यानगर शहरात आता एक वेळ नव्हे तर दिवसातून दोन वेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा शुभारंभ केला. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिल्या आहेत.
सध्या महापालिकेकडून ८० घंटागाड्यांमार्फत कचरा संकलनाचे काम सुरू आहे. नागरिकांनी आपला घरासोबत परिसरही स्वच्छ ठेवावा आणि कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन जगताप यांनी केले. त्यांनी म्हंटले की, “आपली मातृभूमी आणि कर्मभूमी असलेले हे शहर प्रत्येकाने स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली पाहिजे. इंदौरप्रमाणे स्वच्छ शहर निर्माण करण्याचे लक्ष्य आपल्याला मिळून साध्य करायचे आहे.”
शहरात दोन वेळा स्वच्छता करण्याचा निर्णय यापूर्वीही घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी महापालिका कर्मचारी युनियनच्या विरोधामुळे हा निर्णय अमलात आला नव्हता. त्या वेळीचे युनियन अध्यक्ष आक्रमक भूमिकेत होते, त्यामुळे प्रशासनाने माघार घेतली होती. आता मात्र युनियन पदाधिकारी बदलले असल्याने या निर्णयाला फारसा विरोध होण्याची शक्यता कमी आहे.
आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, शहरातील स्वच्छता दोन टप्प्यांत केली जाईल.
महापालिकेचे कर्मचारी शहरातील सर्व प्रभागांमध्ये या वेळापत्रकानुसार स्वच्छतेचे काम करतील.
महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रभाव नेहमीच निर्णायक राहिला आहे. दोन वेळा स्वच्छतेच्या निर्णयाला कर्मचारी विरोध करतात, कारण त्यावर त्यांचा अतिरिक्त कामाचा बोजा वाढतो. यामुळे पतसंस्थेच्या निवडणुकीवर या निर्णयाचा परिणाम होईल का, याबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे.
आयुक्त डांगे यांनी सांगितले की, काही नागरिक अजूनही प्लास्टिक पिशवीत कचरा गोळा करून रस्त्यावर टाकतात, ज्यामुळे नाले-गटारे बंद होतात. अशा नागरिकांवर १,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या प्रभागात नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. “नागरिकांनी कचरा वेळेवर घंटागाडीतच द्यावा आणि शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.






