फोटो सौजन्य: iStock
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आधीच चांगलेच झोडपले असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने त्यांचा आर्थिक समतोल पूर्णपणे बिघडवला आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि उत्पादन खर्चातील वाढ, तर दुसरीकडे बाजारभावातील अनिश्चितता, या दुहेरी संकटामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.
रब्बी हंगामाच्या उंबरठ्यावर रासायनिक खतांच्या किमतींमध्ये अचानक वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. प्रत्येक पिशवीमागे तब्बल 200 ते 400 पर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.
Bacchu Kadu: बच्चू कडूंना मोठा धक्का! मोर्चाबाबत नागपूर खंडपीठाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश
गहू, हरभरा, ज्वारीसह इतर रब्बी पिकांसाठी खतांची मोठ्या प्रमाणावर गरज असते. मात्र खतांचे दर वाढत असताना, कांदा, कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचे बाजारभाव घटलेले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला, पण उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, काही कृषी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांवर खते विक्रीसह लिंकिंगची जबरदस्ती केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रासायनिक खतांसोबत वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर, मायक्रोला आणि मायक्रोरायझा हे उत्पादन जबरदस्तीने विकले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतमालाचे भाव घटलेले असतानाच खते, मजुरी आणि बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. “खतांचे दर हा उत्पादन खर्चातील महत्त्वाचा घटक असून शेती आता परवडणारी राहिलेली नाही,” अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत; संजय राऊतांची टीका
“केंद्र सरकार हे पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. शेतमालाला हमीभाव नाही, त्यात खत दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. ही वाढ केंद्राच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. दर कमी करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे आवश्यक आहे.” असे म्हणणे काँग्रेस नेते संभाजी माळवदे यांचे होते.
“अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच उध्वस्त झाला आहे. शासन एकीकडे दुष्काळाचा दाखला देते आणि दुसरीकडे खतांचे दर वाढवते. हा प्रकार म्हणजे ‘आवाहन देऊन भोपळा घेणे’ असाच आहे. सरकारने दरवाढ मागे घ्यावी आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी.” असे म्हणणे युवा शेतकरी रामदास घुले, तरवडी (ता. नेवासे) यांचे होते.






