Ahilyanagar News: मालेगावच्या घटनेचे पडसाद अकोलेत; शहरात कडकडीत बंद
अत्याचारग्रस्त बालिकेला श्रद्धांजली आणि आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करत नागरिक, महिला, विविध संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकातून मूक निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चादरम्यान बालिकेचा फोटो आणि “जाहिर निषेध” लिहिलेली फलकं नागरिकांच्या रोषाला अधोरेखित करत होती. राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून महिला व लहान मुली सुरक्षित नसल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. अशा भयानक गुन्ह्यांसाठी ‘जागेवर फाशीचा’ कायदा केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आणावा, अशी मागणीही करण्यात आली.
“आपल्या मुलीच्या वयाच्या चिमुरडीवर अत्याचार करताना त्या नराधमाला लाजही वाटली नाही. अशांना पोलिसांकडे न देता जनतेच्या ताब्यात दिले पाहिजे; जनता त्याला दगडाने ठेचून मारील, भर चौकात फाशी देईल,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. “कठोर शिक्षा झाल्यासच अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणातील आरोपीला भर चौकात फाशी द्यावी, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मोर्चामध्ये अकोले नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, माजी सरपंच सुमन जाधव, अभिनेत्री रुचिरा देसाई, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. वसंतराव मनकर, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सचिन शेटे, विश्व हिंदू परिषदचे राहुल ढोक व सुनील गिते, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, शिवसेना नेते माधवराव तिटमे, मनसे तालुका प्रमुख दत्ता नवले, भाऊसाहेब नाईकवाडी, माकपचे सचिन ताजने, सुवर्णकार समाज संघटनेचे विनायक दैवज्ञ, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेणकर, विखे फाउंडेशनचे निखिल जगताप, महेश माळवे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
मोर्च्यानंतर लहान मुली, महिला आणि इतर प्रतिनिधींच्या वतीने पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आले.






