अकोल्यात ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली ‘देवदूत’! (Photo Credit - X)
वैद्यकीय आणि अपघातग्रस्तांसाठी धावली
जिल्ह्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी १०८ ही पहिली निवड ठरत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. अचानक प्रकृती बिघडणे, श्वसनाचा त्रास किंवा बेशुद्ध पडणे अशा विविध वैद्यकीय स्थितीमध्ये तब्बल १ लाख १२ हजार १६६ रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले. अपघात (७,८४३), पॉली ट्रॉमा (५,२४८), रस्त्यावर पडून झालेल्या जखमा (२,५३०) आणि मारहाणीची प्रकरणे (१,५७५) अशा घटनांमध्ये तातडीच्या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचले. विषबाधा (६,७३१) आणि हृदयविकाराचे झटके (१,७७०) आलेल्या रुग्णांना तातडीने प्रतिसाद देत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गर्भवतींसाठी ‘मोबाईल लाइफलाइन’
गर्भवती महिलांसाठी १०८ रुग्णवाहिका गेल्या काही वर्षांत ‘मोबाईल लाइफलाइन’ ठरली आहे. तातडीच्या प्रसूतीवेळी शहरी व ग्रामीण भागातील ४१,९६२ महिलांना सुरक्षित रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात यश आले. विशेष म्हणजे, ९२९ महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच सुरक्षितरीत्या पार पडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नातील १८५ जणांना जीवदान
विविध कारणांनी संकटात सापडलेल्या १७ हजार २३२ रुग्णांना १०८ सेवेमुळे मदत मिळाली. यामध्ये, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या १८५ जणांना वेळेत उपचार मिळून जीवदान मिळाले आहे. आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफची तत्परता, प्राथमिक उपचारांची सुविधा, सज्ज रुग्णवाहिका आणि तातडीचा प्रतिसाद यामुळे १०८ सेवा आरोग्यव्यवस्थेचा मजबूत कणा ठरली आहे. अत्यावस्थ २० रुग्णांचे व्हेंटिलेटरवर व्यवस्थापनही रुग्णवाहिकेतच करण्यात आले.
हे देखील वाचा: Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…






