अवकाळी पावसाचा दणका! उगवलेला हरभरा वाया (Photo Credit - X)
अकोला: यंदा खरिपातील पिकांचे (विशेषतः सोयाबीनचे) उत्पादन घटल्याने मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती. पेरणीनंतर बियाणे उगवले, मात्र मागच्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवेळी पावसामुळे शेतीत पाणी साचले आणि उगवलेल्या हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीची वेळ आली असून, आर्थिक संकट वाढले आहे.
बाळापूर तालुक्यातील अंदुरा भाग दोन शेतशिवारातील गट नंबर २२७ मधील शेतकरी महिला संध्या कचरे यांच्या दोन एकर शेतीत मोठे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेला हरभरा उगवला होता, पण अचानक शनिवारी आलेल्या जोरदार पावसामुळे अर्ध्याहून अधिक पीक नष्ट झाले आहे. आता पुन्हा हरभऱ्याची पेरणी करावी लागणार असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सध्याची स्थिती बघता पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, पेरणी खर्च, मजुरी असा मोठा खर्च हरभरा पिकाला लागलेला असताना, पावसामुळे पुन्हा पेरणी करावी लागत आहे. ‘खर्च वाढला आणि उत्पन्न नाही’ अशा स्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
जालन्यात शेतकरी मेटाकुटीला, परतीच्या पावसाची सरासरी 100 मि.मी. पेक्षा जास्त
या पावसामुळे केवळ हरभराच नव्हे, तर इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. कापसाचे पीक घरात येण्याची स्थिती असतानाच जोरदार पाऊस कोसळल्याने वेचणीचा कापूस भिजून मातीमोल झाला. पावसाचा जबर फटका हातरुण परिसरातील खारपाणपट्टयाला बसला आहे. मांजरी, शिंगोली, मालवाडा, दुधाळा, मंडाळा, बोरगाव वैराळे, अंदुरा भाग एक, अंदुरा भाग दोन, लोणाग्रा, हातला आणि हातरुण या शेतशिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर संकट काळात तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






