कुडाळ : कुडाळ तालुका ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्लाच राहणार, असे वक्तव्य तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे. भाजपमध्ये होणारे प्रवेश हे आर्थिक उलाढालीचे आहेत, अशी टीका राजन नाईक यांनी विरोधकांवर केली आहे. कुडाळ तालुक्यातून विनायक राऊत यांना २५ हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील “तो” पक्षप्रवेश नाहीच! माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे हे शिवसेना ठाकरे गटात आहेत. ते विकासकामांच्या चर्चेसाठी गेले असता भाजपकडून तो प्रवेश दाखविण्यात आला, असा आरोप राजन नाईक यांनी केला.
माड्याचीवाडी ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. मात्र, गेली दहा वर्षे गावातील विकासाचे कोणतेही काम करण्यात आमदार, खासदारांना यश आलेले नाही. त्यामुळे सरपंच विघ्नेश गावडे आणि शेखर गावडे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खा. निलेश राणेंचे नेतृत्व मान्य करीत शनिवारी सायंकाळी उशिरा भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या उपास्थितीत भाजपात प्रवेश केला, अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
मात्र, या बातमीचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, जेष्ठ पदाधिकारी अतुल बंगे यांनी खंडन केले आहे. तर सरपंच विघ्नेश गावडे यांनी सुद्धा विकासकामांच्या चर्चेसाठी आम्ही गेलो असता हा पक्षप्रवेश दाखविण्यात आला आहे. आम्ही गावातील सर्व नागरिक खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांच्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी दिली.