अमरावतीत ६२ टक्के पेरणी पूर्ण, रब्बी पिकांमध्ये हरभरा अव्वल
जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला चांगली चालना मिळाली असून अवघ्या आठवडाभरात तब्बल १४ टक्क्यांनी पेरणी वाढली आहे. आजअखेर जिल्ह्यात ६२ टक्के म्हणजेच ९५ हजार ६८७ हेक्टरवर रब्बी पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये हरभरा आणि गहू या मुख्य पिकांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १ लाख ५४ हजार १० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मागील आठवड्यात पेरणी ४९ टक्क्यांवर होती. ती यंदा ६२ टक्क्यांवर पोहोचली आहे.
रब्बी पिकांमध्ये हरभरा अव्वल असून ६८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर त्याची लागवड झाली आहे. त्यानंतर गहू २२ हजार ११३ हेक्टर, मका १ हजार ३९३ हेक्टर, रब्बी ज्वारी १८५ हेक्टर, मोहरी २४ हेक्टर, जवस १० हेक्टर, तीळ ६ हेक्टर, भाजीपाला ५३० हेक्टर तर कांदा १ हजार ४२१ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अद्याप ३८ टक्के पेरणी बाकी असून त्यातही हरभरा शेतकऱ्यांची विशेष पसंती मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात तब्बल १०० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर चिखलदरा तालुक्यात केवळ २४ टक्के पेरणी झाली असून दर्यापूर २८ टक्के, अंजनगाव सुर्जी ३८ टक्के, चांदूर बजार ४० टक्के पेरणीवर थांबली आहे. मात्र इतर तीन तालुक्यांमध्ये पेरणी ७० टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यात गव्हाची सर्वाधिक ६ हजार ४६ हेक्टर तर हरभराची १२ हजार ८३४ हेक्टर पेरणी झाली आहे. धारणी तालुक्यात गहू ३ हजार ८२७ हेक्टर आणि हरभरा ८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर पेरला आहे.






