विशेष पथके तैनातः निवडणुकीसाठी एफएसटी-८, व्हीएसटी-८ आणि एसएसटी-१० पथके कार्यरत राहतील. मतदान व मतमोजणीदरम्यान ३ पोलिस उपायुक्त, ७ सहाय्यक पोलिस आयुक्त, ३१ पोलिस निरीक्षक, ९१ सहाय्यक/उपनिरीक्षक १६५० पोलिस कर्मचारी ९०० होमगार्ड, एक एसआरपीएफ कंपनी, तीन आरसीपी व चार क्यूआरटी पथके तैनात असतील.
नियंत्रण कक्षात दोन पोलिस निरीक्षक व दोन उपनिरीक्षक नियुक्त असून संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी पाच स्ट्रायकिंग फोर्स आणि अतिरिक्त ६९ पोलिस अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
आचार संहितेदरम्यान छाप्यात ५,५०,१७९ किमतीची १९९३ लिटर दारू, ४,५१,७६० किमतीचा २२.७६ किलो गांजा, १२२.७५ ग्रॅम एमडी ड्रग्ज व वाहनासह १२,४७,८८०, तसेच २९,४३.६२० किमतीचा बंदी घातलेला गुटखा जप्त करण्यात आला. छाप्यांत ४ पिस्तूल/देशी बनावटीची पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, २४ चाकू व ९ तलवारी जप्त करण्यात आल्या.
परिसरात परवानाधारकांकडे एकूण ३७२ बंदुका ( ३५८ परवाने) आहे. त्यापैकी २८९ बंदुका पोलिसांकडे जमा करण्यात आल्या आहेत. ७८ परवानाधारकांना सूट, तर एक परवाना रद्द करण्यात आला आहे. चार बंदुका जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मतदानाच्या दिवशी शहरात ३७ सेक्टर पेट्रोलिंग पथके सतत गस्त घालतील. २२ विभागांमध्ये ४४ स्टेशन हाऊस ऑफिसर्स तैनात करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली आठ विशेष पथके सक्रिय राहणार आहेत.
मतदारांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे आणि असामाजिक घटकांमध्ये भिती पाडण्यासाठी फ्रेजरपुरा, बडनेरा, राजापेठ व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांनी रूट मार्च केले. या रूट मार्चद्वारे पोलिसांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारच्या गडबडी, अफवा किंवा कायदा-व्यवस्था भंग करण्याच्या प्रयत्नांना कडक पद्धतीने दाबले जाईल.






