पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी पुन्हा आले तर देशातील लोकशाही नष्ट होईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिल्लकसेना काय आहे हे पाहायचं असेल तर फडणवीसांनी याव. ही शिल्लकसेना असेल तर त्यांच्याकडे फक्त कचरा गेला आहे. शिवसेना म्हणजे महासागर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात यावं, शिवसेना पुण्याच्या मैदानात उतरली आहे, असे राऊत म्हणाले.
२०२४ नंतर देवेंद्र फडणवीस राहणार आहेत का? २०२४ नंतर भाजप शिल्लक राहणार नाही. शिवसेना सत्तेवर असेल. पुण्यातून शिवसेनेचे किमान ३ आमदार जातील ही शिवसेनेची गॅरंटी आहे. तर लोकसभेचा खासदार देखील भाजपचा नसेल. जी भाषा मला बाळासाहेबंनी शिकवली ती महाराष्ट्रातील संतांची भाषा आहे. २०२४ नंतर पनवती जाईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी आज दिसतात हे बाळासाहेब ठाकरे यांची कृपा आहे. गुजरात दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी मोदींना हटवणार होते. पण जेव्हा लालकृष्ण अडवाणी बाळासाहेब ठाकरे यांना विचारायला आले. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं मोदी गया तो गुजरात गया. आज संपूर्ण देश सांगत आहे. नरेंद्र मोदी आले तर देश जाईल. लोकशाही, स्वातंत्र जाईल.
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. वातावरण भाजपच्या विरोधात होते. मात्र EVM उघडलं. देशातील फक्त एक निवडणूक बॅलेटपेपरवर घ्यावी, त्यानंतर जो निकाल येईल तो निकाल सर्व देश मान्य करेल. नरेंद्र मोदी लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान होतात. अंधभक्ती आणि अंधश्रद्धा देशाला खड्ड्यात घालणार आहे, असे राऊत म्हणाले.