मुंबई : राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. काही आमदारांच्या मतदानावर घेण्यात आलेला आक्षेप, क्रॉस वोटिंग, व्हीपची अंमलबजावणी असे नाट्य या निवडणुकीत पाहायला मिळाले. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वप्रथम मतदानाचा हक्क काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी बजावला आहे. नितीन राऊत यांचे मत बाद करण्याची मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
बबनराव लोणीकर नेमकं काय म्हणाले ?
माझा नंबर आधी असताना नितीन राऊतांनी मतदान केले आहे, असा आक्षेप लोणीकरांनी घेतला आहे. नितीन राऊत यांच्या विरोधात मी निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचे लोणीकरांनी म्हटले आहे. मतदान होणाऱ्या सभागृहात नितीन राऊत अर्धातास आधी कसे गेले असा सवाल लोणीकर यांनी केला आहे. त्यामुळे आता राऊत यांचे मतदान रद्द करावे यासाठी मी मागणी करणार आहे. माझे नाव पहिले असताना नितीन राऊत यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, असा आरोपही लोणीकर यांनी केला.
[read_also content=”हर घर तिरंगा अभियानातून घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल : अमित शहा https://www.navarashtra.com/india/through-the-har-ghar-tricolor-campaign-patriotic-consciousness-will-be-created-in-every-household-amit-shah-nrdm-305250.html”]
दरम्यान, पहिलं मतदान केल्यानंतर नितीन राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पहिलं मतदान करण्याची संधी मला मिळाली. पक्षाच्या आदेशानुसार युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आम्ही मतदान केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरघोस मतदान त्यांना मिळेल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.