मुंबई : अयोध्येमध्ये (Ayodhya) प्रभू श्री रामांची (Shree Ram) प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कारसेवेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. अनेक राजकारण्यांनी आपले कारसेवेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत स्वप्नपूर्ती झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. यानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी बाबरी मशीदची वीट (Babri Masjid) भेट म्हणून दिली. याबाबत राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
बाबरीच्या वीट बद्दल बोलताना बाळा नांदगावकर देखील उपस्थित असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसैनिकांमध्ये बाळा नांदगावकरही होते. तिथल्या दोन विटा ते घेऊन आले होते. त्या विटांचं वजन जास्त होतं. तुम्हाला लक्षात येईल की तेव्हाची बांधकामं कशी होती. ही वीट हातात घेऊन बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल. तेव्हाची बांधकामं का चांगली असायची? कारण तेव्हा कंत्राटं निघायची नाहीत,” अशी मिश्कील टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.
बाळा नांदगावकरांनी दिला आठवणींना उजाळा
कारसेवक म्हणून गेलेल्या बाळा नांदगावकर यांनी तेव्हाच्या आठवणींना उजाळा दिला असून राज ठाकरेच आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे असल्याचे म्हटले. नांदगावकर म्हणाले, “तो प्रसंग फार बाका होता. तेव्हा माहिती नव्हतं की परत जिवंत येऊ की नाही. माझी इच्छा होती की जेव्हा राम मंदिर तयार होईल तेव्हा ही वीट मी बाळासाहेब ठाकरेंना सुपूर्त करेन. त्याला आता 32 वर्षं झाली. आज बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. पण आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राज ठाकरेच आहेत. त्यामुळे माझा शब्द पूर्ण झाला. मी दोन विटा आणल्या होत्या. माजगावचं कार्यालय बांधताना तिथे खाली एक वीट ठेवली होती. ते कार्यालय मी मनसेत आल्यानंतर शिवसेनेला सुपूर्त केलं होतं. आता ते कार्यालय यशवंत जाधवनं गिळंकृत केलं आहे. दुसरी वीट मी 32 वर्षांपासून जपून ठेवली होती,” अशा शब्दांत बाळा नांदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.