लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
बीड : मुलीच्या लग्नासाठी बँकेत ठेवीच्या स्वरूपात एकाने रक्कम ठेवली होती. हे ठेवलेले पैसे मिळत नसल्याने पित्याने बँकेच्या गेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले.
सुरेश आत्माराम जाधव हे येथील छत्रपती मल्टीस्टेट बँकेचे ठेवीदार होते. तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतही त्यांचे खाते होते. दोन्ही बँकांमधील पैसे लेकीच्या लग्नासाठी त्यांना काढायचे होते. लेकीचे लग्न जवळ येत असल्याने छत्रपती मल्टीस्टेटमधील 11 लाखांच्या ठेवी काढण्याची प्रक्रिया समजून घेत त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. कार्यासाठी जास्तीचे पैसे हाताशी असावेत म्हणून ज्ञानाराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवलेल्या 5 लाखांच्या ठेवी काढण्यासाठीही प्रक्रिया सुरू केली होती.
दरम्यान, मुलीच्या लग्नासाठी सुरेश यांना 16 लाखांची गरज होती. त्यामुळे साठवलेले पेसै काढण्यासाठी त्यांनी बँकेत खेट्या घालण्यास सुरुवात केली होती. सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही सुरेश यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी स्वतःला संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबासह ते बँकेत गेले होते. त्यानंतर पुढील काही वेळातच बँकेच्या मुख्य गेटवर ते मृतावस्थेत आढळून आले.
सिडको मुख्यालयातही आत्महत्येचा प्रयत्न
दुसऱ्या घटनेत, नवी मुंबईतील सिडको मुख्यालयात 83 वर्षीय शेतकऱ्याने छळाचा आरोप करत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दत्तू भिवा ठाकूर नावाच्या या शेतकऱ्याला सिडको अधिकाऱ्यांनी थांबवले आणि बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात नेले, जिथे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.