मुंबई – निवडणुका आधीच मुंबई काँग्रेसनं भाकरी फिरवली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकीच्या (Election) धरतीवर सर्वंच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. तर मुंबईत पालिका (BMC) निवडणुकीची रणनिती आखली जात असताना, आणि काँग्रेस मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरुन हटवले आहे, तर नवीन अध्यक्ष म्हणून माजी मंत्री व आमदार वर्षाताई गायकवाड यांची नियुक्ती केली आहे, तसे पत्रकच पक्षश्रेष्ठींनी काढले आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळं पक्षाने अचानक भाई जगताप यांची उचलबांगडी का केली, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दलित चेहरा म्हणून गायकवाड यांची नियुक्ती
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर दलित चेहरा देण्यात यावा म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणारे भाई जगताप यांना अचानक पक्षाने का हटवले यावर चर्चा होत आहेत. दरम्यान, “जाती धर्म बघून कधीही काँग्रेसने निर्णय घेतले नाहीत. या गोष्टीचा आणि विचारांचा मला अभिमान आहे.” अशी प्रतिक्रिया भाई जगतापांनी दिली आहे.
काँग्रेसनं माझ्याशी चर्चा केली नाही
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर भाई जगताप यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ गायकवाड यांच्याशी बोलूनच माझीही नियुक्ती करण्यात आली होती. पण यावेळी माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. आठवडाभर ही चर्चा सुरु असून, नेत्यांशी बोलूनच हा निर्णय झाला आहे. कृपाशंकर सिंह, संजय निरूपम, मिलिंद देवरा यांच्याशी चर्चा करूनच अन्य लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. पण याबाबत मला कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती, असं जगताप म्हणाले. मुंबई काँग्रेस एका महिलेला संधी देते, याचा मला आदर आणि अभिमान आहे, असं भाई जगताप म्हणाले.