डोंबिवली-अमजद खान : भाऊ पोलीस खात्यात भरती होईल या आशेने बहिणीने पोलिसात भावाला भरती करणाचे आमिष दाखविणाऱ्या व्यक्तीला ८० हजार रुपये आणि ५५ हजार रुपयांचा महागडा मोबाईल दिला. अनेक दिवस उलटून गेले तरी भाऊ पोलिसात भरती झाला नाही. मात्र तो व्यक्ती या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता. महिलेच्या लक्षात आले की तिची फसवणूक झाली आहे. तिने मानपाडा पोलिसांना संपर्क साधला. या प्रकरणात सापळा रचत मानपाडा पोलिसांनी अरविंद निकम नावाच्या भामट्याला अटक केली आहे. या भामट्याने राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलीस खात्यात भरती करतो असे सांगून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
डोंबिवलीत राहणारी एक महिला अरविंद निकम याच्या ओळखीची होती. डोंबिवलीतील उमेशनगरातील निलकमल बंगल्यासमोर राहणारा अरविंद निकम याने सांगितले की, त्या महिलेच्या भावाला तो पोलीस खात्यात नोकरीला लावतो. महिलेचा विश्वास संपादीत करण्याकरीता अरविंदने पोलीस मित्रमंडळाचे एक ओळखपत्र आणि आरोग्य खात्याचे एक ओळखपत्र दाखविले. तो लाेकांना मी पोलीस आणि आरोग्य खात्यात कोणाचीही भरती करुन त्याला कामाला लावू शकतो. महिलेला वाटले भाऊ लवकर पोलीस खात्यात भरती होईल. या आशेपोटी ८० हजार रुपये अरविंदला दिले. त्यानंतर एक ५५ हजार रुपयांचा महागडा मोबाईलही घेऊन दिला. अनेक दिवस उलटून गेले तरी भावाला नोकरी लागली नाही.
महिलेच्या लक्षात आले की, तिची फसवणूक होत आहे. या संदर्भात महिलेने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबााने यांच्याशी संपर्क साधला. विजय कादबाने यांनी पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले. पोलीस कर्मचारी सुनिल पवार, संजीव म्हसाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिल्लारे, दिपक गर्गे, सोमनाथ टिकेकर यल्लप्पा पाटील, देवा पवार, नागेश भोईर, शांताराम कसबे, प्रवीण किनरे, अनिल घुगे, चिंतामण कातकळे, अशोक अहेर, विजय आव्हाड, महेंद्र मांजा, नाना चव्हाण, नागेश बडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी अरविंदला पकडण्याकरीता एका ठिकाणी सापळा रचला.
अरविंद त्या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता. महिलेने मी मोबाईल देते असे सांगत त्यासाठी तुम्ही घरडा सर्कलला या असे सांगितले. अखेर हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या भामटयाने अनेक तरुणांची फसवणू केल्याची माहिती आहे. पोलीस तपास करीत आहे. पोलीस भरतीकरीता नागरीकांनी कोणाच्या आमिषाला बळू पडू नये. असे कोणी मागणी करीत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.