Bhandara News: धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलासा! ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर, नियम जाणून घ्या
जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ज्या संस्थांना धान खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत, त्यांनी विहित मुदतीत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने काही कठोर नियम आणि अटी लागू केल्या आहेत, ज्यांचे पालन करणे शेतकरी आणि संस्था या दोघांसाठीही आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी नोंदणी प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. चालू हंगाम खरीप २०२५-२६ चा पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत किंवा रद्द केलेला धनादेश, ओळखपत्रः आधार कार्डची स्पष्ट छायांकित प्रत, शेतकऱ्याचा अधिकृत आणि सुरू असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
शासकीय नियमानुसार पारदर्शक पद्धतीने नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित खरेदी संस्थांची आहे. नोंदणी करताना कोणताही गैरप्रकार, चुकीची माहिती किंवा बोगस नोंदणी आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. अशा प्रकरणांत दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कडक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी दिला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि ३१ डिसेंबर पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे आधारभूत किमतीचा लाभ मिळणे शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे.
नोंदणी प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. ऑनलाईन नोंदणी करताना संबंधित शेतकरी प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्याचा ‘लाईव्ह फोटो’ घेऊनच नोंदणी पूर्ण केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे पणन विभागाने स्पष्ट केले आहे. केवळ ‘बीम’ पोर्टलवर झालेली नोंदणीच ग्राह्य धरली जाईल.
भिवंडीत संवर्धनाचा अभाव; कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र देखरेख नाही; नागरिकांमध्ये संताप
धान खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, त्यामुळे बँक तपशील भरताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘बीम’ पोर्टलवर बँक खात्याची माहिती अचूक नोंदवली पाहिजे. नोंदणी करताना संबंधित खाते ‘अॅक्टिव्ह’ असल्याची खात्री संस्थेने करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावेच ते बँक खाते असावे. पासबुकमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे नसावीत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊन चुकारे मिळण्यास विलंब होऊ शकतो.






