मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवून शालेय स्तरावर देखील सहलींचे आयोजन करण्याचा मानस आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी मध्ये २६ नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट’च्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा,पर्यटन सचिव सौरभ विजय, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, भदंत डॉ.राहुल बोधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यासह मान्यवर उपस्थित होते
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे व बुध्दिस्ट स्थळांचा समावेश असलेली राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचा या पर्यटन टूरमध्ये समावेश आहे. विभागनिहाय सर्किट मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या जिल्ह्यात आहेत. या पर्यटन सर्कीटच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात असे पर्यटन सर्किट तयार केले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पर्यटन सर्किट करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि त्यांनी केलेले कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हे पर्यटन सर्किट अत्यंत मोलाची भूमिका बजावेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणी भेट देणे, याचा एक वेगळाच अनुभव असतो. तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. यापुढे जाऊन शालेय स्तरावरील सहलीचा देखील या पर्यटन सर्किटमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक लवकर पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व सामाजिक न्यायाला अनुसरून आमचे शासन काम करेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे चिरंतन राहील- मंत्री रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले, बाबासाहेबांनी जात, भाषा ,धर्म या पलीकडे जाऊन मानवतेच्या हितासाठी किंबहुना देशाच्या हितासाठी दिलेले संविधान हे सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे. संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका ही अत्यंत मोलाची आहे. पर्यटन टूर सर्किटच्या माध्यमातून हे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. भारतामध्ये बौद्ध धर्माचा झालेला उगम हा जागतिक स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे बुद्ध काळापासूनच भारतात लोकशाहीतील समता हे तत्व रुजले आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले.