Bhayandar: 'जोडो मारो' आंदोलनात मराठा बांधव आक्रमक; प्रशांत कोरटकरच्या बेताल वक्तव्याविरोधात संतापाची लाट
भाईंदर/विजय काते :- छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर हा सध्या मराठा समाजाच्या रोषाचा धनी ठरत आहे. महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळल्यानंतर त्याच्याविरोधात आज मीरा-भाईंदर शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार ‘जोडो मारो’ आंदोलन करण्यात आले. गोल्डन नेस्ट सर्कल येथे पार पडलेल्या या आंदोलनाला शेकडो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत कोरटकरने केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. सोशल मीडियावर कोरटकरविरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला जात असून, सर्वसामान्य मराठा तरुणांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत प्रत्येक जण कोरटकरच्या या वक्तव्याचा निषेध करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याविषयी अशा शब्दांत बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भावना समाजातून व्यक्त केली जात आहे.
आज मीरा-भाईंदरमध्ये झालेल्या आंदोलनात सकल मराठा समाजाच्या विविध संघटना, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर कोरटकरच्या प्रतिमेचे जोडे मारून, फेकून आणि तुडवून त्याचा प्रतीकात्मक समाचार घेण्यात आला. या आंदोलनादरम्यान “छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही”, “जय भवानी जय शिवाजी”, “प्रशांत कोरटकर मुर्दाबाद”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनात सहभागी झालेल्या समाजबांधवांनी सरकारकडे जोरदार मागणी केली की, महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करणारा विशेष कायदा तयार करण्यात यावा. केवळ तोंडी निषेध करून चालणार नाही, अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा अमलात आणला पाहिजे, अशी ठाम भूमिका समाजाने मांडली. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने याबाबत कोणतीही गफलत खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी थेट इशारा देत सांगितले की, प्रशांत कोरटकर हा जर कधी समाजाच्या हाती लागला, तर त्याला जिथे भेटेल तिथे चोप दिला जाईल. छत्रपतींविषयी अपशब्द काढणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. महाराजांचा अपमान करणाऱ्याला रस्त्यावर फिरणेही कठीण करू, अशी आक्रमक भूमिका मांडण्यात आली. कोरटकरसारख्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे, असेही अनेकांनी म्हटले.
या आंदोलनात मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत मराठा एकजुटीचे दर्शन घडवले. युवा पिढीने या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि श्रद्धा दाखवून दिली. महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, कोरटकरविरोधात रोष व्यक्त केला.
आंदोलनानंतर समाजबांधवांनी स्पष्टपणे सांगितले की, हे आंदोलन फक्त सुरुवात आहे. जर कोरटकरला तातडीने अटक झाली नाही किंवा भविष्यात अशा वक्तव्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छेडले जाईल. महाराजांच्या स्वाभिमानाशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, असा ठाम निर्धारही व्यक्त करण्यात आला.