दौंड तालुक्यातील राजकारण हे भिमा पाटस साखर कारखान्याच्या भोवतीच सातत्याने फिरत आहे. तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे राजकारण केवळ भीमा पाटस कारखान्याच्या वरच चालु आहे. मागील काही दिवसांपासून भीमा पाटस कारखान्याच्या प्रशासकीय निवडीचे बदलते नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मागील वीस दिवसात अतिशय वेगाने या घडामोडी घडत असल्याने तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
भीमा पाटस कारखान्यावर प्रशासकीय समिती नियुक्तीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर ) यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी नियुक्ती केली. यामध्ये अध्यक्ष म्हणून वसंतराव विनायक साळुंखे, सदस्य संभाजी दत्तात्रय ताकवणे व तुषार दत्तात्रय शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्तीवर आक्षेप घेत भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे यांनी राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे २४ एप्रिल २०२६ रोजी अपील दाखल केले.
या अपीलावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तत्काळ स्थगिती आदेश दिला. या स्थगिती आदेशावर प्रशासकीय नियुक्ती अध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी स्थगिती आदेश उठवण्याबाबत ३० एप्रिल २०२६ मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर मुंबई उच्च न्यायालयात ७ मे २०२६ रोजी सुनावणी झाली. या सुनावणीत शासनाच्या वकिलांनी सहकार मंत्री यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी चा प्रशासन समिती नियुक्त आदेश रद्द केल्याचे आदेश दाखल केले.
त्यावर न्यायालयाने टिपणी करत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून कारखान्याची निवडणूक सहा वर्ष झाली नसल्याने ती निवडणूक तातडीने घेणे बंधनकारक असल्याचे मत नोंदवले तसेच शासनाला दोन आठवड्यात कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान , भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांच्यासह संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक प्रकाश लक्ष्मण जगताप यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम भिकोबा ताकवणे यांनी ६ मार्च २०२६ रोजी सहकार मंत्री यांना पत्र पाठवत ॲड. राहुल सुभाष कुल, राहू ( पूर्वीचे अध्यक्ष) नामदेव बहिरू बारवकर, वरंवड ( पूर्वीचे उपाध्यक्ष ) व आनंद कृष्णाजी थोरात, बोरीपार्थी, माजी उपाध्यक्ष यांची नव्याने प्रशासकीय पदावर नियुक्त करण्याबाबत विनंती अर्ज दाखल केला. त्यानंतर माजी आमदार रमेश थोरात यांनी ११ मे २०२६ रोजी पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर ) यांना विनंती अर्ज दाखल करत सत्वशील मधुकरराव शितोळे, पाटस, उद्धव राजाराम फुले, लडकतवाडी व पाराजी बाबुराव हंडाळ, केडगाव यांची प्रशासकीय समितीवर नियुक्ती करण्याची मागणी केली.
मात्र यावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली ७ दिवसांची मुदत दि. १३ मे २०२६ रोजी संपत होती. दोन्ही याद्या मधील सदस्यांची पात्रता तपासून विहित कालावधीत समिती नेमणे अशक्य असल्याने दि. १२ मे २०२६ रोजी कारखान्यावर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश लक्ष्मण जगताप यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश दिले. त्यामुळे सहकारी आणि राजकीय क्षेत्रातील गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या आणि कारखान्याचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना मोठा दणका बसला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यात भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने आणि प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रकाश जगताप जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांची नेमणूक केल्याने हा आमदार राहुल कुल व त्यांच्या संचालक मंडळाला मोठा धक्का बसला असून भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरील सत्तासंघर्ष आता नव्या वळणावर पोहोचला आहे.






