Bhima Koregaon Violence : आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगापुढे तब्बल तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनावर गंभीर आरोप करीत चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे.
प्रकाश आंबेडकरांची तब्बल २ तास साक्ष नोंदववण्यात आली
१ जानेवारी २०१८ मध्ये पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी समाजावर समाजकंटकांनी हल्ला घडवून आणला होता. यामध्ये प्रशासनामधील लोकांनी जाणीवपूर्वक वरपर्यंत माहिती पोहोचू दिली नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या दंगल प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगापुढे आज त्यांची तब्बल २ तास साक्ष नोंदववण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर तपशील दिला.
दंगलीत संभाजी भिडेंचा सहभाग
आंबेडकर म्हणाले, “भीमा कोरेगाव दंगलीत संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचं पुण्याचा पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे. याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहे. प्रश्न हा आहे की, २८, २९, ३० डिसेंबर २०१७ रोजी पुणे जिल्ह्याच्या २० किमीच्या अंतरावरील लोकांना सांगलीहून ज्यांचे ज्यांचे फोनकॉल आले त्यांची चौकशी झाली पाहिजे.
सांगलीवरून कोण कोण आले होते
हे फोन कोणत्या क्रमांकावरुन आले, त्यांची संघटना कुठली होती? सांगली जिल्ह्यातून पुण्यात २८, २९, ३० डिसेंबर २०१७ रोजी कोण कोण आले? त्यांनी भीमा कोरेगावला भेटी दिली होती का? त्यांची ओळख काय? या गोष्टी आयोगानं तपासल्या पाहिजेत”
पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रातून महत्वाचा भाग वगळला
चौकशी आयोगापुढं पोलिसांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र आलं आहे. यामध्ये भीमा कोरेगावसह परिसरातील गावांच्या ग्रामपंचायतींनी कुठले ठराव केले होते. त्याचा उल्लेख या प्रतिज्ञापत्रातून वगळलेला आहे.
ही दंगल घडवण्यात आली आहे कारण व्हॉट्सअॅपमधील चॅट्स, एकमेकांबद्दल बदललेली माहिती ही सर्व कागदपत्रे कमिशनसमोर सादर करण्यात आली आहेत. या कागदपत्रांबाबत मी कमिशनला विनंती केली आहे की, प्रामुख्यानं गुप्तचर विभाग कोल्हापूर रेंज यांच्याकडं दोन दिवस आगोदर काय माहिती होती याची चौकशी करण्यात यावी, असंही आंबेडकर म्हणाले.
पोलिसांची माहिती थांबवली
दंगलीच्या दिवशी पुण्याचे पोलीस अधीक्षक कुठे होते? दंगलीवेळी त्यांची भूमिका काय होती? माझ्या माहिती प्रमाणं पोलिसांची जी छोटी मोठी युनिट्स आहेत, त्यांच्याकडून माहिती गोळा केली जाते. ही माहिती वरिष्ठ पातळीवर जाण्यापासून कोणी थांबवली? याची चौकशी झाली पाहिजे.
त्यामुळं गृहसचिव, मुख्य सचिव, आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत किती वाजता माहिती पोहोचली हे देखील तपासलं गेलं पाहिजे. कारण तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस १ जानेवारीला भीमा कोरेगावपासून ४० किमी अंतरावर नगर जिल्ह्यात होते.
सकाळी ११.३० ते १.४० दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरनं टेकऑफ केल्याची नोंद आहे. त्यामुळं त्याचदिवशी दंगल सकाळी झाली, त्यांना जर कळलं असतं तर त्यांनी पुण्यात येऊन आढावा घेतला असता.
फडणवीसांना माहिती मिळालीच नाही
पण फडणवीसांना माहिती मिळालीच नाही, अशी माझी स्वतःची माहिती आहे. त्यामुळं दंगल उसळलं हे प्रशासकीय की राजकीय अपयश आहे? याचा तपास आयोगानं करायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी माहिती दाबून ठेवली याची माहिती मी पुढच्या साक्षीमध्ये देणार आहे.
कारण मुंबई बॉम्बस्फोटासारख्या घटनेत सर्व इनपूट असताना केवळ माहिती मिळू शकली नसल्यामुळं स्थानिक पोलीस कारवाई करु शकले नाहीत, त्यामुळं २६/ ११ घडलं. पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत. त्यामुळं जबाबदारी निश्चित करणं ही जबाबदारी कमिशननं घ्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली.
सरंजामशाही, ब्राह्मणशाहीची युती
“माझी उलटतपासणीही झाली. यामध्ये प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तर मी दिलेली आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं दफन कोणी केलं? या वादातून त्या ठिकाणी नवीन राजकीय व्यवस्था उभी राहते आहे. मराठ्यांची सरंजामशाही आणि ब्राह्मणशाहीची नव्यानं युती या ठिकाणी होत आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.