महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; रमेश चेन्निथला यांच्यासह बड्या नेत्यांना दिली मोठी जबाबदारी
Maharashtra Congress: महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मंगळवारी मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (MPCC) साठी राजकीय व्यवहार समिती (PAC) स्थापन केली आहे. यासोबतच अनेक वरिष्ठ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्याही देण्यात आल्याची माहिती आहे.
काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, महाराष्ट्र पीएसीची कमान राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या समितीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, अविनाश पांडे, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे आणि इतर अनेक अनुभवी नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. ही समिती पक्षाचे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेईल आणि निवडणुकीच्या तयारीला दिशा देईल, असे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, राज्य युनिटमधील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेसने अनेक पातळ्यांवर नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाने १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, १०८ सरचिटणीस आणि ९५ सचिवांची नावे जाहीर केली आहेत. या सर्व अधिकाऱ्यांवर पक्षाला तळागाळात सक्रिय करण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाने ८७ सदस्यांची कार्यकारिणी देखील स्थापन केली आहे, जी राज्यभरात पक्षाचे कार्यक्रम, हालचाली आणि इतर उपक्रम राबवेल. महाराष्ट्राव्यतिरिक्त, काँग्रेसने कर्नाटकमध्येही निवडणूक आघाडीची तयारी सुरू केली आहे. पक्षाने तिथल्या निवडणूक प्रचार समितीसाठी नवीन नियुक्त्या केल्या आहेत. ज्येष्ठ नेते एल हनुमंतैय्या यांची या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेस आता मिशन २०२५ आणि आगामी निवडणुकांच्या तयारीत पूर्णपणे गुंतली आहे. संघटनेतील या नवीन नियुक्त्यांमुळे पक्ष तळागाळात मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.
शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा
या मोठ्या फेबदलाच्या पार्श्वभूमीवर आज ३० जून रोजी राजधानी दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार, माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, सध्याच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, नेत्या यशोमती ठाकूर आणि ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या पाच बड्या नेत्यांनी दिल्लीत हजेरी लावली आहे. या बैठकीत मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या काळात राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. त्यासाठी अनेक नेत्यांवर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.