माणिकराव कोकाटेंच्या रमी प्रकरणातील चौकशी अहवालात गंभीर निरीक्षण
Manikrao Kokate News: राज्याचे कृषीमंत्री आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पत्ते खेळल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. आता या संदर्भातील चौकशी अहवालात कोकाटे यांनी तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळल्याची स्पष्ट नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अशाच प्रकारचा आरोप झाला होता, मात्र कोकाटे यांच्याबाबतचा अहवाल अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचे बोलले जात आहे.
विरोधी पक्षांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे, कोकाटे यांच्याकडून मात्र सारवासारव केली जात असल्याचे दिसत आहे. अशातच या प्रकरणाशी संबंधित विधीमंडळाचा चौकशी अहवाल आता समोर आला आहे. आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळण्याच्या वादावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी नुकतेच एक ट्विट करून विधानमंडळाच्या चौकशी अहवालाचा उल्लेख केला आहे.
शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा
या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, “कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का?” असा सवालही रोहित पवारांनी सरकारला विचारला आहे.
काही दिवसांपूर्वी कोकाटे यांचा मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विरोधकांनी यावरून त्यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. आता चौकशी अहवालातही हे प्रकार खरे ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने, कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. “रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांना विसरा हमी, खेळा रम्मी,” अशा शब्दांत खणखणीत टोला रोहित पवार यांनी लगावला होता.
Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होऊ शकतो अनपेक्षित लाभ
सभागृहात रमी खेळल्याच्या वादग्रस्त प्रकरणामुळे मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. आता या प्रकरणाचे परिणाम थेट त्यांच्या मंत्रिपदावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्यात कोकाटे यांच्या भवितव्याबाबत गंभीर चर्चा झाली. या चर्चेत, “मंत्रिपद काढून घेण्याऐवजी त्यांच्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे सोपवण्याचा पर्याय अधिक सोयीचा ठरेल,” अशी भूमिका मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत, “कोकाटे यांचे कोणतेही स्पष्टीकरण सरकारसाठी फायदेशीर ठरणार नाही,” असा ठाम सूर घेतल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या हकालपट्टीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.