अकलुज : भारतीय जनता पक्षाने माढ्याची उमेदवारी रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना जाहीर केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यास सुरुवात केली. मात्र, या बैठकीला भाजपचे घटक पक्ष यांना बोलावले नाही, त्यांना विश्वासात घेतले नाही, त्यामुळे याचा फटका रणजितसिंह निंबाळकर यांना बसण्याची जोरदार शक्यता आहे. रयत क्रांती संघटना, बच्चू कडू यांचा प्रहार संघटना यांना कुठेही भारतीय जनता पक्षाने सन्मानाने बोलावले नाही. त्यामुळे घटक पक्ष नाराज आहेत.
नुकतेच माढा येथे संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचाराची बैठक संपन्न झाली. या बैठकीला कोणालाही निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे आगामी काळात मित्रपक्ष माढ्यात भाजप विरोधात तीव्र संताप व्यक्त करतील, यात काही शंका नाही. भारतीय जनता पक्षाने आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात भूमिका घेणार असे रोखठोक मत रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी सांगितले.
रणजितसिंह निंबाळकर हे सोलापूर जिल्ह्यातील नसून सुद्धा मागच्यावेळी त्यांना खासदारकीला निवडून दिले. भरघोस मतांनी त्यांच्या पदरात मताचे दान टाकले. परंतु, खासदार झाल्यानंतर त्यांनी मोजकेच पुढारी हाताशी धरले. त्यामुळे सामान्य माणूस आज संतप्त झालेला आहे, जो तो निंबाळकर विरोधात प्रतिक्रिया देत आहे, याचा भारतीय जनता पक्षाने विचार करावा. घटक पक्ष म्हणजे भाजपचे गुलाम नाहीत, पाहिजे तेव्हा तुमच्या घरची धुणीभांडी करतील.
भाजपच्या नेत्यांनी वेशांतर करून गाववाड्यात यावे आणि सामान्य माणस काय बोलतात? रणजितसिंह निंबाळकर यांच्याविषयी किती त्यांच्या मनामध्ये राग आहे हे त्यांना कळेल. जरी निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला येथील जनता ही निंबाळकरांना अजिबात मतदान करणार नाही, असे रोखठोक राहुल बिडवे यांनी सांगितले.
निंबाळकरांना पराभूत करुनच दाखवून देऊ
‘माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर कोणत्याही बैठकीत आम्हाला बोलावले नाही. बहुतेक भाजपच्या गर्विष्ठ नेत्यांना आमची गरज वाटत नसेल. परंतु, आमचे उपद्रवमूल्य काय आहे हे निंबाळकरांना पराभूत करुनच दाखवून देऊ’.
– राहुल बिडवे, राज्य प्रवक्ते, रयत क्रांती संघटना.






