मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात 40 आमदार एकत्र आल्यामुळं राज्यात भाजप सत्तेत (BJP in Power) आली, याची आठवण शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी करुन दिलेली आहे. शिवसेनेच्या सर्व 40 आमदारांनी सोबत राहायला हवे, असंही किर्तीकर म्हणाले आहेत. शिंदे गट आणि भाजपा यांच्यात सुरु असलेली धुसफूस, भाजपाकड़ून वाढत चाललेला दबाव या सगळ्या पार्स्भूमीवर किर्तीकर यांचं हे विधान महत्त्वाचं मानण्यात येतंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या बैठकीत किर्तीकर यांनी हे विधान केलेलं आहे. कल्याण-ठाणे लोकसभा मतदारसंघांवरुन सध्या स्थानिक भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत संघर्ष निर्माण झालेला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. ठाणे, पालघर आणि कल्याण मतदारसंघांवर भाजपानं दावा केल्याचं सांगण्यात येतंय. यातून दोन्ही गटांत संघर्ष सुरु आहे. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी भाजपाकडून होतेय. तर त्या अधिकाऱ्याला श्रीकांत शिंदे पाठिशी घातल असल्याची चर्चा आहे. या संघर्षात श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
दुसरीकडं भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळं मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं मानण्यात येतंय. शिंदे गटाचे असलेले 5 मंत्री यांची हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. या पाचही मंत्र्यांवरुन मुख्यमंत्र्यांची कोंडी झालेली दिसतेय. अशा स्थितीत आता शिंदे गट आक्रमक होताना दिसतो आहे.
40 आमदारांचं महत्त्व, धैर्य वाढवण्याचा प्रयत्न
गजानन किर्तीकर यांनी केलेलं विधान हे भाजपाला संदेश असल्याचं मानण्यात येतंय. यापूर्वीही भाजपा शिंदे गटातील खासदारांना सन्मानानं वागणूक देत नसल्याचं किर्तीकर म्हणाले होते. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाकडून सारवासारव करण्यात आली होती. मात्र आता किर्तीकरांनीच 40 आमदारांचं महत्त्व जाणून घ्या, असं सांगत शिंदे गटातील आमदारांचं मानसिक बळ वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे.