मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी भेट घेतली. विशेष म्हणजे कालच राज ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा मनसे व भाजप, शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.
आशिष शेलार यांनी आज राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली. भेटीनंतर आशिष शेलार यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. आशिष शेलार म्हणाले, राज ठाकरेंसोबत केवळ सदिच्छा भेट झाली. भेटीत राजकीय चर्चा झाली नाही.
आशिष शेलार यांनी भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असे म्हटले असले तरी अंधेरी पोटनिवडणुकीनिमित्त मुंबईत नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या आशिष शेलार यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कुणाची? या प्रश्नावरुन ठाकरे व शिंदे गट आमने-सामने आले आहेत. सुरुवातीला अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गटातर्फे लढली जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मागील निवडणुकांत अपक्ष उमेदवार असूनही दुसऱ्या क्रमांकाची मते खेचणाऱ्या मुरजी पटेलांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे शिंदे गटाने ही जागा भाजपला सोडली. या मतदारसंघात गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिंदेगटाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. त्यातच मनसेचा पाठिंबा मिळाल्यास भाजपला या निवडणुकीत अधिकचं बळ मिळणार आहे. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.