वसई-विरार : विरारमध्ये १०७ इमारतीं बोगस कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे. आता येथील संतनगरमध्येही बोगस इमारतींच्या संदर्भात सीसीद्वारे ७ इमारती उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे. याचप्रकरणी ५ बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत पासून जिल्हाधिका-यांपर्यंत सर्वांचीच बोगस कागदपत्रे तयार करुन विरारमध्ये ५५ इमारती उभारण्यात आल्याचे प्रकरण मागील काही महिन्यात उघड झाले होते.
देशभरात खळबळ उडवून देणा-या प्रकरणात बिल्डरांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर अधिक तपासानंतर अशा १०७ इमारती असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर विरारमधीलच संत नगरात ७ इमारती बोगस सीसीद्वारे उभारण्यात आल्याचा गुन्हा विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुरेश पाटील यांच्या तक्रारीनुसार सिध्दी बिल्डर, शुभम डेव्हलपर्स, सद्गुरू बिल्डर आणि साई समर्थ बिल्डरवर ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४७४ एमएरआटीपी आणि महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट तसेच नोंदणी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बिल्डरांनी सर्वे नं. २२६ च्या हिस्सा क्र. ४ मध्ये ४ मजल्याच्या ७ इमारती २००६-०७ मध्ये उभारल्या होत्या. बोगस कागदपत्रांच्या आधारे त्यांनी त्यातील फ्लॅट विकून सर्वांचीच फसवणूक केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






