नोकरीसाठी चक्क मंत्रालयात घेतल्या बोगस मुलाखती; नागपूरच्या भामट्याने 1.60 कोटी उकळले (File Photo : Mantralay)
मुंबई : चांगली नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यात सरकारी नोकरीच्या आशेने अनेक तरुण आरोपींच्या जाळ्यात अडकतात. असाच एक प्रकार नागपुरात घडला. नागपूर येथील एका भामट्याने आपल्या कृत्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेलाच हादरवले आहे. भामट्याने नोकरी इच्छुक असलेल्या बेरोजगार तरुणांच्या चक्क मंत्रालयात मुलाखती घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नागपुरातील या भामट्याने 2019 ते 2022 या कालावधीत अनेक बेरोजगार तरुणांना कनिष्ठ लिपिक पदाच्या बनावट नोकरीचे आमिष दाखवून लाखाची फसवणूक केली. प्राथमिक तपासात या भामट्याने सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी एकाला अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे, या भामट्यांनी मुंबईतील कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या मंत्रालयातच इच्छुक उमेदवारांच्या बोगस मुलाखती घेतल्या. ज्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
नागपूर पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर मुख्य आरोपी लॉरेन्स हेनरी (४५, रा. नागपूर) याला मुंबईतून अटक केली. लॉरेन्स हेनरी सूत्रधार असून, त्याची पत्नी शिल्पा हेनरी उर्फ शिल्पा उदापुरे (वय ४०), वसंतकुमार उर्फ वसंतराव उदापुरे (६०), विजय पटणकर (४०), नितीन साठे (४१), सचिन डोलास (४५) आणि एक चतुर्थश्रेणी कर्मचारी (नाव अज्ञात) हे इतर आरोपी आहेत. यापैकी लॉरेन्स हेनरी याला अटक केली असून, इतर सर्व आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मुख्य आरोपी ‘बंटी-बबली’
आरोपीने सरकारी नोकरीच्या बनावट जाहिराती देऊन बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढले. ते प्लेसमेंट एजंट आणि सरकारी अधिकारी म्हणून वावरत असत. मुख्य आरोपी लॉरेन्स हेनरी आणि त्याची पत्नी शिल्पा यांनी ‘बंटी-बबली’ जोडीप्रमाणे काम केले. भामट्यांनी नागपूरमध्ये जॉब कन्सल्टन्सी फर्मच्या नावाखाली कार्यालय उघडले होते.
पाच ते दहा लाख उकळले
इच्छुक उमेदवारांना मंत्रालयातील कनिष्ठ लिपिक पदासाठी थेट मुलाखतीचे आमिष दाखवले जायचे. उमेदवारांकडून मूळ कागदपत्रे गोळा केले जात असत आणि ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतची रक्कम हप्त्यांमध्ये वसूल केली जायची. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, या ठगाने मुंबईतील चक्क मंत्रालयातच बनावट मुलाखती घेतल्या.
जे. जे. हॉस्पिटलमध्ये मेडिकलही !
नितीन साठे हा ‘राम यादव’ नावाने अवर सचिव (अंडर सेक्रेटरी) म्हणून सोंग करत असे आणि मुलाखती घेत असे. मुलाखतीनंतर उमेदवारांना बनावट ओळखपत्रे देऊन आणि जेजे हॉस्पिटलमध्ये बनावट वैद्यकीय तपासणी करून विश्वास बसवला जायचा.