चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती (Photo Credit- Social Media)
पुणे : सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी पुन्हा सूस घनकचरा प्रकल्पावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती घेत, आजच प्रकल्प बंद न झाल्यास, उद्या सदर प्रकल्पाविरोधात खुर्ची टाकून बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.
सूस रस्त्यावरील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प बंद करण्याची सातत्याने मागणी होत आहे. सदर प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करुन नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी 2024 मध्ये झाला होता. त्याअनुषंगाने चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासोबत आज बैठक झाली. या बैठकीत ना. पाटील यांनी सदर प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीत अद्याप सदर प्रकल्प स्थलांतरित का झाला नाही? असा प्रश्न ना. पाटील यांनी उपायुक्त संदीप कदम यांना विचारला. त्यावर कदम यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून कोणतीच कारवाई झालेली नसल्याने, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
तसेच, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून महापालिकेच्या भोंगळ काराभाराप्रति निषेध व्यक्त केला. त्याशिवाय महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांना सदर प्रकल्प आजच बंद झाला नाही; तर उद्या प्रकल्पाविरोधात बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.






