Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष
Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
मागील दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील नगरपरिषदा व महानगर पालिकेच्या निवडणुकांवर स्थगिती आली होती. त्यामुळे कोणत्याही पदाची व उमेदवारीची अपेक्षा न करता विधानसभा, लोकसभा निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्ते पक्षासाठी झटले. नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. नगरपरिषदांच्या निकालानंतर बंडखोरीचे गणित लक्षात घेत, काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एबी फार्मचे वाटप केले. त्यामुळे ऐनवेळी निष्ठावंत कार्यकत्यांना पक्षाकडून तिकीट न देता बाहेरच्या पक्षातून आलेल्या उपऱ्या उमेदवारांना संधी देण्यात आली. (फोटो सौजन्य – Pinterest)
त्यामुळे ऐनवेळी अनेक ठिकाणी भाजप व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. भाजपामध्ये आ. सुधीर मुनगंटीवार व आ. किशोर जोरगेवार यांच्या वादामध्ये मुनगंटीवार समर्थकांना झटका देण्यात आला. ज्यात प्रामुख्याने वंदना तिखे, चंद्रकला सोयाम, वंदना जांभूळकर, विशाल निंबाळकर, अजय सरकार, माया उईके, राहुल घोटेकर, रवी आसवानी, शीतल आत्राम यांचा समावेश आहे. तर खा. प्रतिभा धानोरकर व आ. विजय वडेट्टीवार यांच्या वादात वडेट्टीवार समर्थक असलेल्या माजी नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया, प्रशांत दानव, सकिना अन्सारी यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. तिकीट कापण्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे.
पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाने बंडखोरी टाळण्यासाठी नामांकनाच्या अंतिम दिवशी उमेदवारी जाहीर केली. असे करूनही अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही पक्षांसमोर बंडखोरीचे आवाहन निर्माण झाले आहे. पंक्षांतर्गत नाराजीसत्राचे परिणाम मतदानावर होऊन तिसऱ्या पक्षाचा अथवा अपक्ष उमेदवाराचा लाभ होण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
६६ जागांसाठी एकूण ५६२ उमेदवारांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत १७ प्रभागातील नामांकन दाखल केले आहे. शुक्रवारी (दि. २) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास कोणत्या प्रभागातून कोणता पक्ष यशस्वी होते? हे पाहण्यासारखे आहे. बंडखोर उमदेवारांनी अर्ज मागे न – घेतल्यास पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आवाहन निर्माण होईल हे निश्चित आहे.






