चंद्रपूर किडनी रॅकेट प्रकरणातील मोठी अपडेट समोर; 'किडनी रॅकेटचा तपास आता...'
चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंध असलेल्या देशव्यापी किडनी तस्करी प्रकरणाच्या तपासात विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले असून, सोलापूर येथील रामकृष्ण सुंचू हा या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अवैध अवयव व्यापाराचे जाळे उभारणे, गरीब दात्यांचा शोध घेणे, रुग्णांशी संपर्क साधणे, आर्थिक व्यवहार आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे समन्वयन करण्याची प्रमुख भूमिका त्याने बजावल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याने किडनी रॅकेटचा तपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
चंद्रपूर येथे वार्षिक तपासणी दौऱ्यावर आलेले पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सुंचू हा दिल्लीस्थित शल्यचिकित्सक डॉ. रविंदर पाल सिंग आणि त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांच्या माध्यमातून संपूर्ण नेटवर्क चालवत होता. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना लक्ष्य करून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या किडनी मिळवली जात असल्याचे तपासात उघड झाले.
एसआयटी प्रमुख तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत ५ हजार पानांचे विस्तृत आरोपपत्र ब्रह्मपुरी येथील न्यायालयात दाखल करण्यात आले. दिल्ली, कोलकातासह विविध ठिकाणावरून गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास पूर्णत्वाकडे गेला असून, लवकरच पूरक आरोपपत्रही सादर केले जाणार आहे. हे प्रकरण प्रथम उघडकीस आले तेव्हा नागभीड तालुक्यातील कर्जबाजारी शेतकरी रोशन कुले याच्यावर कंबोडियामध्ये बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण झाल्याची माहिती समोर आली होती. देशभर पसरलेल्या अवयव तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश झाला.
डॉ. सिंग, डॉ. गोविंदस्वामी अजूनही फरारच
डॉ. सिंग आणि डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी हे दोघेही सध्या फरार असून, उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत. दिल्ली आणि त्रिची येथे पाठवलेल्या पोलिस पथकांनाही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींवर मानवी अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण कायद्याच्या कलम १८ आणि १९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. फरार डॉक्टरांना अटक झाल्यानंतर या रॅकेटमधील आर्थिक व्यवहार आणि आंतरराज्यीय नेटवर्कबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली.






