मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) याच्या अटकेच्या प्रकरणात, सीबीआयनं (CBI) एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात लाच घेतल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. आता मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यात शाहरुख खान आणि आर्यन खान यांनाही या प्रकरणात आरोपी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
शाहरुख खानही दोषी ?
रशीद खान पठणाम यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे. आर्यन खान याला वाचवण्यासाठी समीर वानखेडे यांनी 50 लाखांची लाच घेतल्याचा सीबीआयच्या वतीनं करण्यात आलेला आहे. भ्रष्टाचार निवारण कायद्यानुसार लाच घेणाऱ्यासोबत लाच देणाराही दोषी असल्यानं शाहरुखच्या विरोधातही खटला चालावा आणि त्याला शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
के. पी. गोसावीच्या वतीनं समीर वानखेडे यांना लाच देणाऱ्या शाहरुख आणि आर्यन यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात यावं, अशी ही मागणी आहे. हा तपास सीबीआयकडून काढून एसआयटीकडं सोपवावा, अशीही मागणी करण्यात आलीय.
काय आहे प्रकरण?
1. 2 ऑक्टोबर 2021 कासी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. 26 दिवसांनंतर 30 ऑक्टोबर रोजी त्याची सुटका करण्यात आली.
2. 15 मे 2023 रोजी समीर वानखेडे यांच्या घरी सीबीआयनं छापा घातला. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. वानखेडे यांच्या एका साथीदारानं या प्रकरणात 50 लाख घेतल्याचा दावाही तपास यंत्रणांनी केलेला आहे.
3. सीबीआयनं या प्रकरणात वानखेडे आणि इतर पाच जणांविरोधात लाच आणि जबरदस्तीनं वसुली या आरोपांत गुन्हा दाखल केलेला आहे.
4. सीबीआयकडून वानखेडेंची चौकशीही करण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी याचिका दाखल केली. त्यानंतर 23 जूनपर्यंत वानखेडे यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे.