मुंबई :अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटनावेळी (Ram Mandir Inauguration) अनेक गोष्टींचे कौतुक तर काही गोष्टींवर विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govinddev Giri Maharaj) यांचे भाषण सर्वात जास्त चर्चिले गेले. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी अयोध्येतील भाषणादरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा उल्लेख केला. या उल्लेखावरुन अनेकांनी कौतुक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. आता या प्रकरणावर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांनी प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्यानंतर राज्यामध्ये याचे पडसाद उमटू लागले. यानंतर आता यावर शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, गोविंदगिरी महाराज काय म्हणाले आहेत, हे मला माहिती नाही. परंतु, शिवाजी महाराजांची तुलना कोणीच करू शकत नाही. आपण त्यांचा आदर्श आणि विचार घेऊन चालायचं आहे. शिवाजी महाराज जगात आदर्श आहेत. शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकेल असा कोणीही या जगात अद्याप जन्माला आलेला नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विचारांतून त्यांचा आदर्श घ्यायचा आहे अशी प्रतिक्रिया संभाजी महाराजांनी दिली.
काय म्हणाले होते गोविंददेव गिरी महाराज
“तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज मला स्वामी समर्थ महाराज यांचीही आठवण होत आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले, निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी . आज आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे,” अशा शब्दांमध्ये भावना व्यक्त करताना गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधानांची तुलना शिवाजी महाराजांशी केली.