सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीत यंदा ५४,८०८ मतदार (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): सिल्लोड नगर परिषदेच्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन देखील युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. सिल्लोड शहरात गेल्या सहा वर्षात नगर परिषद हद्दीत तब्बल १० हजार मते वाढली असून ४४ हजारावरून आकडा ५४ हजाराच्या वर गेला आहे.
सिल्लोड नगरपरिषदेच्या २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ४४ हजार २९८ एवढी मतदार संख्या होती यात दहा हजाराच्या वर मतांची वाढ होऊन आकडा आता ५४ हजार ८०८ एवढा झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून गणल्या गेलेल्या सिल्लोड नगरपरिषदेत या सार्वत्रिक निवडणुकीत १४ प्रभागांमधून २८ सदस्य निवडले जाणार आहेत. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून २८ सदस्यांमध्ये तीन अनुसूचित जाती तर एक अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे. ५० टक्के महिला आरक्षण निकषानुसार १४ जागावर महिला सदस्य निवडून येणार आहेत.
२०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत यांना दोन जागांची वाढ झाली असून गत वेळी २६ सदस्य निवडून देण्यात आले होते. सोमवार १० नोव्हेंबर पासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून १७नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
| तपशील | माहिती |
| निवडणुकीची तारीख | २ डिसेंबर (सार्वत्रिक निवडणूक) |
| सद्य मतदारसंख्या | ५४,८०८ |
| २०१९ मधील मतदारसंख्या | ४४,२९८ |
| झालेली वाढ | सुमारे १०,००० हून अधिक |
| सदस्य संख्या | २८ (१४ प्रभागातून) |
| राखीव जागा | अनुसूचित जाती- ३, अनुसूचित जमाती- १ |
| महिला आरक्षण | ५०% निकषानुसार १४ जागा |
| नगराध्यक्ष पद | सर्वसाधारण प्रवर्गासाठी |
| मतदान केंद्रे | ६१ |
निवडणुकीचे वेळापत्रक आणि घडामोडी
२०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन जागांची वाढ झाली आहे. गतवेळी २६ सदस्य निवडले गेले होते, आता २८ सदस्य निवडले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार, १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे.
काँग्रेसच्या मुलाखती छत्रपती संभाजीनगरात
काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती छत्रपती संभाजीनगर येथे घेतल्या तर शिवसेना शिंदे गटाच्या मुलाखती सिल्लोड शहरात रविवारी पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शप), शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (अप), एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, बसपा या पक्षांचेही उमेदवार निवडीबाबत बैठकांचे सत्र सुरु आहे. ८०८ शहरातील ५४ हजार मतदारांमधून मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शहरात ६१ मतदान केंद्रे राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे.






