छत्रपती संभाजीनगर नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले (Local Body Election 2025) आहे. एकीकडे प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. आज, सोमवार, १० नोव्हेंबरपासून अर्ज विक्रीला सुरुवात होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात कोण-कोण उतरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणूक प्रक्रिया व वेळापत्रक:
कार्यकाळ संपूनही विविध कारणांमुळे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि कारभार प्रशासकांच्या हाती होता. मात्र, राज्य निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आता निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर मतदानाला अवघे काही दिवसच हातात राहणार आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवारांना उभे करायचे, हा मोठा निर्णय पक्षांना त्वरित घ्यावा लागणार आहे.
राजकीय पक्षांची चढाओढ
जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, पैठण, गंगापूर या तालुक्यांमध्ये राजकीय चढाओढ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या तालुक्यांमध्ये शिंदेसेनेचे आमदार आहेत आणि नगरपंचायतीवरही त्यांचेच प्राबल्य आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गट कोणता उमेदवार देतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Maharashtra Politics: “सत्ताधारी पक्षातील कुठल्याही…”; ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचे मोठे विधान
यंदाचे राजकारण वेगळे
मागील निवडणुकीच्या वेळी राजकीय चित्र वेगळे होते. यावेळी महायुतीत (शिंदेसेना, भाजप) एकत्रित निवडणूक लढणार की स्वबळावर उमेदवार देणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हा तिढा सुटल्यानंतरच त्यांचे उमेदवार समोर येतील. दुसरीकडे, महाविकास आघाडीतही (काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा) अद्याप प्रबळ दावेदार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची नावे समोर येतील आणि त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
‘नगराध्यक्ष आमचाच…’ आणि दावेदार वाढले!
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास केवळ काही दिवस शिल्लक असताना, पक्षीय आणि स्थानिक पातळीवर निर्णय न झाल्यामुळे या पदाचे ‘वजनदार’ दावेदार वाढले आहेत. यंदा मतदार पक्षापेक्षा उमेदवार पाहून मतदान करण्याच्या भूमिकेत येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आकडेवारी: नगरपरिषद/नगरपंचायत
| नप/नपं क्षेत्र | प्रभाग संख्या | एकूण सदस्य | एकूण मतदार |
| सिल्लोड | १४ | २८ | ५४,८०८ |
| वैजापूर | १२ | २५ | ४२,३३४ |
| कन्नड | १२ | २५ | ३७,५४९ |
| गंगापूर | १२ | २५ | ३७,७८० |
| खुलताबाद | १० | २० | २९,२८७ |
| फुलंब्री (न.पं.) | १७ | १७ | १४,७४५ |
‘फॉर्म तर आणू, नंतर बघू’ ची रणनीती
पहिल्या दिवशी अर्ज (फॉर्म) घेणाऱ्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व तालुका ठिकाणी तयारी ठेवली आहे. राजकीय पक्षांकडून ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरता येईल, या विचाराने अनेक इच्छुक पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी गर्दी करण्याच्या तयारीत आहेत.
“आधी फॉर्म तर घ्या… नंतर पुढचं बघू,” अशी भूमिका घेत इच्छुकांनी पहिल्याच दिवशी आपली ताकद दाखवण्याची तयारी केल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसत आहे.
महायुती, आघाडी की ‘एकला चलो’? कार्यकर्ते संभ्रमात
निवडणुकीचे नगारे वाजत असतानाही, ‘एकला चलो’ की महायुती किंवा आघाडी याबाबत पक्षश्रेष्ठींकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात आहेत. सहा वर्षांपासून सत्तेपासून दूर राहिलेल्या कार्यकर्त्यांना चालून आलेली संधी युती/आघाडीच्या निर्णयामुळे दुरावण्याची शक्यता दिसत आहे. युती किंवा आघाडी झाली, तर विजयाचा दावा पक्का होऊ शकतो, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.






