मटक्यावर मृत्यूचा संदेश अन् भुताटकी आणि जादूटोणा...; स्थानिक रहिवाशांमध्ये पसरली भीती; नेमकं प्रकरण काय? (Photo Credit - X)
नेमकी घटना काय?
वाळूज परिसरातील बजाजनगर- वडगाव (को) रोडवरील एका शाळेसमोर हा धक्कादायक प्रकार समोर आला. काही अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात जादूटोणासदृश वस्तू आणि पूजा केलेले मडके ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले. हा प्रकार सोशल मीडिया रील बनवण्यासाठी किंवा खोडसाळपणा म्हणून केला असावा, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. ही बाब समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत भानामती आणि भुताटकीला साजेशी संशयास्पद वस्तू ही तिथून हटवण्यात आली आहे. याप्रकरणी व्यवस्थापक नामदेव बनकर यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
असा होता ‘त्या’ मटक्यावरील मजकूर
याबाबत शाळेचे संचालक म्हणाले की, शाळेच्या गेटसमोर हा प्रकार सकाळी उघडकीस आला. मटक्याची पूजा करून तेथे अगरबत्ती, लिंबू, मीठ, कुंकू टाकलेले होते. ओलांडून गेला तर मृत्यू होईल, पाठीमागेवळून पाहिले तर मरून जाशील. भूत प्रेत येथेच्छ ! आसा मजकूर त्यावर लिहिलेला होता. नागरिकांत दहशत पसरली आहे.
अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन
अफवांवर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका, जागरूक राहा. करणी, जादूटोणा, भानामती आणि भुताटकी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. हा केवळ खोडसाळपणा असू शकतो. अंधश्रद्धेपेक्षा आपल्या सुरक्षेला महत्त्व द्या, असे आवाहन रोहित खैरे, अशोक लगड, पंडित नवले, किशोर उमाळे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल खंडागळे यांनी केले.






