वीजपुरवठा खंडित, शहरात पुन्हा जलसंकट (Photo Credit- X)
११ तास पाणी उपसा बंद; शहरावर पाणीटंचाईचे सावट
मंगळवारी पहाटे फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला. ७०० आणि ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा पुरवठा सव्वा चार तास, तर मुख्य १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा पुरवठा तब्बल १० तास ४० मिनिटे बंद राहिला. यामुळे संपूर्ण शहराचे पाण्याचे वेळापत्रक आता एका दिवसाने पुढे सरकले आहे.
नेमका बिघाड काय झाला?
पहाटे ४:२५ वाजता वीज पुरवठा अचानक बंद झाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासणी केली. सकाळी ६:०० वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला, पण महावितरणच्या २२० केव्ही फिडरमध्ये ‘ट्रिपिंग’ झाल्याने पुन्हा अंधार झाला.सकाळी ८:३५ वाजता: अखेर बिडकीन फिडरवरून वीज घेऊन उपसा सुरू करण्यात आला.
संताप: ऐन निवडणुकीत पाणीबाणी!
शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण असताना आठवडाभरात दोनवेळा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. धरणात पाणी असूनही ते घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला वारंवार अपयश येत असल्याने “आम्हाला मुबलक पाणी कधी मिळणार?” असा सवाल संभाजीनगरकर विचारत आहेत.
१. महावितरणचा लहरीपणा: वारंवार वीज पुरवठा खंडित होणे.
२. जुन्या जलवाहिन्या: वारंवार गळती आणि पाईप फुटण्याचे प्रकार.
३. नियोजनाचा अभाव: जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यातील समन्वयाची कमतरता.
“पाणी असूनही ते मिळत नसेल, तर या यंत्रणेचा काय उपयोग? आठ दिवस पाणी येत नाही आणि आले तरी ते फक्त तासाभरासाठी. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.” — एक संतापलेला नागरिक.






