मनपा निवडणूकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज (Photo Credit- X)
सुरक्षा व्यवस्थेचा ‘स्मार्ट’ प्लॅन
महानगरपालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील ३६३ इमारतींमध्ये १,२६४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यंत क्रिटिकल मतदान केंद्रांची यादी महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केली असून, त्यानुसार विविध भागांतील दहा मतदान केंद्रांचा समावेश आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून संवेदनशील मतदान केंद्रांची स्वतंत्र यादी अद्याप प्राप्त झालेली नाही.
‘क्रिटिकल’ घोषित केलेली प्रमुख मतदान केंद्रे
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी येथील मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा, सिडको एन-९ भागातील व्ही. आर. स्कॉलरडेन स्कूल व बळीराम पाटील हायस्कूल परिसर, रोजाबाग येथील मौलाना आझाद पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च सेंटर तसेच मौलाना आझाद सायन्स बिल्डिंगमधील मतदान केंद्रांचा क्रिटिकल यादीत समावेश आहे. याशिवाय सातारा परिसरातील शांतीनिकेतन प्राथमिक शाळेतील पूर्व व पश्चिम भागातील मतदान खोल्या, पडेगाव कॉलनीतील महापालिका प्राथमिक शाळा, जालना रोडवरील सिंचन भवन, सिडको एन-७ मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल व द वर्ल्ड स्कूल, तसेच टाऊन सेंटर सिडको एन-४ येथील किलबिल बालक मंदिरातील मतदान केंद्रांचा समावेश आहे.
स्मार्टसिटी सेंटरशी थेट जोडणी
या दहा क्रिटिकल मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी वेवकास्टिंग करण्यात येणार असून, निवडक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. हे कॅमेरे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल रूमशी थेट जोडले जाणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या केंद्रांवर सातत्याने निरीक्षण ठेवले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.






