'छत्रपती' साखर कारखान्याकडून ऊसाला प्रति टन 3101 रुपयांची पहिली उचल जाहीर
बारामती मधील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील ऊसासाठी प्रति टन 3101 रुपये इतकी पहिली उचल जाहीर केली आहे. त्याचबरोबर जानेवारी 2026 मध्ये येणाऱ्या खोडव्यासाठी प्रति टन 100 रुपये अनुदान देण्याची घोषणाही करण्यात आली. या निर्णयाची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्षांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ऊसउत्पादकांच्या खात्यावर पहिल्या उचल रकमेचा जमा 10 डिसेंबर 2025 रोजी केला जाणार आहे.
यावर्षी कारखान्याने 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना सुरू होऊन 31 दिवस झाले असून, आज अखेर 2,16,503 मे.टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. साखर उतारा 10.22 इतका नोंदवला गेला आहे.
कारखाना पूर्वीप्रमाणेच समान अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा वापरत असतानाही नुकत्याच बदललेल्या संचालक मंडळाने तोटा नियंत्रित ठेवून दैनंदिन गाळप क्षमता 8,000 मेट्रिक टन पर्यंत नेल्याचे जाचक यांनी सांगितले.
कारखान्याचे दोन्ही प्लांट सुरळीत सुरू असून, आतापर्यंत 64 लाख 88 हजार मे.वॅट विजेची निर्मिती करण्यात आली आहे.
“माझा कारखाना – माझी जबाबदारी” या ब्रीदवाक्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले. कारखाना क्षेत्रात Artificial Intelligence तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सदस्यांनी आपला ऊस फक्त छत्रपती कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन करताना अध्यक्ष म्हणाले की, दैनंदिन गाळप सुरळीत सुरू राहिल्यास कारखाना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल.
कारखान्याचा वजनकाटा पूर्णपणे अचूक असून, गाळप झालेल्या उसाचे पैसे वेळेत अदा केले जाणार असल्याचे जाचक यांनी स्पष्ट केले. “काटा चोख, पेमेंट रोख” या नवीन ब्रीदवाक्यानुसार ऊस उत्पादकांचा विश्वास राखण्याचे आश्वासन संचालक मंडळाने दिले.
कारखान्याचे संचालक रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, बाळासाहेब कोळेकर, ॲड. शरद जामदार, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, विठ्ठलराव निंबाळकर, प्रशांत दराडे, अनिल काटे, सतीश देवकाते, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, मंथन कांबळे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव आणि जनरल मॅनेजर हनुमंत करवर आदी उपस्थित होते.






