सौजन्य - नवराष्ट्र टीम
पंढरपूर : सांगोला तालुक्यातून उगम पावणारा कासाळ ओढा उपरी पळशी, सुपली, बंडीशेगाव या गावातून वाहत जात शेळवे येथे चंद्रभागा नदीमध्ये मिसळतो. पावसाळ्यामुळे सध्या ओढा दुथडी भरून वाहत आहे. परंतु या ओढ्यावरून पलीकडे जाण्यासाठी पूल नसल्यामुळे अक्षरशा ओढ्याच्या भिंतीवरील पाच ते सहा फूट पाण्यातून उपरी येथील शेतकरी, शालेय विद्यार्थी व महिलांना दररोज जीव घेणाप्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून ओढ्यावर पूल करून मिळावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे. ही मागणी अद्यापही मान्य न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील जवळपास नऊ गावातून हा कासाळ ओढा वाहत आहे. पावसाळ्यातील दिवसांमध्ये ओढा नेहमीच दुधडी भरून वाहत असतो. उपरी, सुपली व बंडी शेगाव येथील ग्रामस्थांच्या शेतजमिनी ओढ्या पलीकडे असून, अनेकांनी ओढ्यापलीकडे शेतामध्ये पक्की घरेही बांधली असून, पुढे पलीकडे मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. पावसाळ्यातील दिवसांमध्ये ओढा दुधडी भरून वाहत असतो, ओढा पार करण्यासाठी ओढ्यावर पूल नसल्यामुळे ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीवरून नागरिकांना प्रवास करावा लागत असतो, या भिंतीवर नेहमी सात ते आठ फुटापर्यंत पाणी असते, अशाही परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन पालक प्रवास करत असतात. शेतकरी व महिलाही याच भिंतीवरून प्रवास करतात. बंधाऱ्याची भिंत अरुंद व निमुळती झाली आहे यामुळे पाण्यात पडण्याचा धोकाही असतो. येथे मागील काही वर्षांपूर्वी दोन शेतकरी महिला वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष
पक्का रस्ता नसल्यामुळे ओढ्याच्या पाण्यात सिमेंट पाईप टाकून पाणी असल्यानंतर तात्पुरता रस्ता करून त्यावरून ऊस वाहतूक करावी लागत असते, परंतु पावसाळ्यामध्ये ओढा दुथडी भरून वाहू लागल्यानंतर त्या पाईपही वड्याच्या पाण्यात वाहून जातात. असा प्रकार वारंवार येथे घडत आहे. त्यामुळे ओढ्यावर कायमस्वरूपी पूल करून मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शेतकरी करत आहेत. परंतु लोकप्रतिनिधींचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्यामुळेच आज बंधाऱ्याच्या भिंतीवरून सर्वांनाच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी पूल झाला नाही तर आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशारा येतील शेतकरी ब्रह्मदेव नागणे, विश्वजीत गव्हाणे, राजेंद्र आसबे, यशवंत सुरवसे, रमेश नागणे, सुनील नागणे, राहुल मोहिते, विशाल गव्हाणे, शहाजी गव्हाणे यांनी दिला आहे.
तीन पिढ्यांपासून पुलाची मागणी
या कासाळ ओढ्यावर पूल करून मिळावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासून उपरी सुपली व बंडीशेगाव ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु लोकप्रतिनिधींकडून केवळ आजवर आश्वासने दिली गेली आहेत. मध्यंतरी काही अधिकारीही येथे फिरकले परंतु त्यांनीही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दोन ते तीन पिढ्यांपासून सुरू असणारी मागणी आजही ‘जैसे थे’ च आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे.