संग्रहित फोटो
कोल्हापूर : सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या मतदाराला विचारपूस करू लागला आहे. मात्र, कोल्हापुरातील एका भागात मुलभूत मागण्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपल्या परिसरातील कामं न झाल्याचा राग व्यक्त करत जवळपास ४०० ते ५०० नागरिकांनी थेट आगामी निवडणुकीत मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.
आपल्या राहत्या घराच्या परिसरात मुलभूत कामंही न झाल्याने महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांचा असंतोष कोल्हापुरात पाहायला मिळाला आहे. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक ८ मधील चिंतामणी कॉलनी, शिक्षक कॉलनी, एस.टी. कॉलनी आणि शिवशंभो कॉलनी या परिसरात मुख्य मार्गावरील रस्ते, नाले आणि गटारींचे कामं दिर्घकाळापासून प्रलंबित आहेत. निवडणुका आल्यानंतर फक्त तोंड दाखवायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे याबाबत पाठपुरावा करुन या भागातले नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. काम अजूनही सुरू न झाल्यामुळे परिसरातील रहिवाश्यांना रोजच ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनासह तक्रारी केल्या आहेत. मात्र, ठोस प्रतिसाद किंवा कार्यवाही झाली नाही. या कारणांमुळे प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे.
नागरिकांच्या मुलभूत सुविधांकडे प्रशासनानं केलेल्या दुर्लक्षामुळे राजगोल पाणंद परिसरातील मतदारांनी महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा ठराव केला आहे. “विकास नाही, रस्ते नाही तर मतदानही नाही” असा आक्रमक संदेश या भागातील नागरिकांनी पोस्टर्स लावून आणि प्रसिद्धीपत्रकांद्वारे प्रसारित केला आहे. तसेच, परिसरातील मतदारांच्या सह्यांसह याबाबतचं निवेदन कोल्हापूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही देण्यात आले आहे.
“प्रशासनाकडून कोणतीही विकासकामे आणि मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे या निवडणुकीत या परिसरातील कोणीही मतदान करणार नाही. चिंतामणी कॉलनी, शिक्षक कॉलनी, एस.टी. कॉलनी आणि शिवशंभो कॉलनीतील आम्ही सर्वजण मतदार प्रशासनाला अंतिम इशारा देत आहोत. जलदगतीनं काम सुरू केली नाहीत, तर पुढील सर्वच निवडणुकीत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील.” असं येथील नागरिकांनी ठणकावून सांगितलं आहे.
“या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताच मुख्य रस्ता नाही. फक्त एक सरकारी पाणंद आहे. हा एकमेव रस्तादेखील सध्या येण्या-जाण्यासाठी गैरसोयीचा आहे. पावसाळ्यात तर पायीसुद्धा या मार्गानं ये-जा करणं अशक्य होते. तसेच, या भागातील अंतर्गत रस्ते आणि गटारदेखील महानगरपालिकेनं आजवर केलेले नाहीत”, अशी व्यथा देखील या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मांडली. नागरिकांच्या या भूमिकेची माहिती मिळताच माजी नगरसेवक राहुल माने यांनी तत्काळ या भागातील नागरिकांची भेट घेतली. प्रशासनाकडे या समस्येचा पाठपुरावा करत आहोत. यापुढेही प्राधान्यानं या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले. मात्र, तरीही नागरिकांनी आपला निषेध कायम ठेवला आहे.
दरम्यान, कोल्हापूरच्या या नागरिकांचा निवडणूक आणि मतदानावर बहिष्काराचा संदेश फक्त स्थानिकच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही प्रशासनाला मोठं आव्हान देणारा ठरत आहे. तर नागरिकांना सकारात्मक निर्णय आणि उपाययोजना न दिल्यास येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप घेऊ शकतं. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक त्या पावलांची तात्काळ तरतूद करणं गरजेचं आहे.






