मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला शुभारंभ कार्यक्रम
नागपूर: सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील (Indian Army) खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल मनोहर ठोंगे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहीद झालेल्या सैनिकाच्या जीवनाचे मोल करता येणे शक्य नाही. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी शासनाच्यावतीने 25 लाख रुपये देण्यात येत होते. यामध्ये ४ पटीने वाढ करण्यात येऊन एक कोटी रुपये करण्यात आले आहे. शासनाकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येते. सेनेप्रती भाव असलेले अनेक नागरिक आपल्या रोजच्या मिळकतीमधून ध्वजदिन निधीसाठी पैसे देत असतात. हा निधी सत्कारणी लागतो, या निधीमधून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
🔸 Launch of Fundraising campaign on the occasion of 'Armed Forces Flag Day 2025' at the hands of CM Devendra Fadnavis.
Minister Shambhuraj Desai, MoS Adv Ashish Jaiswal, soldiers of Indian Armed Forces, families of the martyr soldiers and other dignitaries were present. 🔸… pic.twitter.com/5Vnr0aCMRI — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 8, 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाने भारतीय सेनेचा पराक्रम बघितला आहे. त्यानंतर भारतीय सेनेचा शक्तिशाली देशाच्या सेनेमध्ये समावेश झाला आहे. भविष्यातही कुठलेही आव्हान आल्यास भारतीय सेना ते पेलण्यासाठी सक्षम आहे. सेनेच्या शौर्याने आपण देशाच्या सर्व सीमा सुरक्षित ठेवत आहोत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी आपापल्या परीने सहभाग देऊन सेनेप्रती आपला भाव व्यक्त करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा बॅच लावून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. नागपूर जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तथा अन्य विभाग प्रमुखांचा सन्मान करण्यात आला.
नागपूर शहरातील फुल विक्रेते आशिष गडीकर व संतोष गडीकर यांनी आपल्या दररोजच्या मिळकतीमधून प्रति महिना 500 रुपये ध्वज दिन निधी संकलनात दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याव्यतिरिक्त 1965 आणि 1971 च्या युद्धातील सैनिक मेजर हेमंत जकाते यांनी 2025 च्या निधी संकलनात 50 हजार आणि श्रीमती गीता कोठे यांनी एक लाख रुपये ध्वजदिन निधी दिल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.






