CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; मुंडेंच्या राजीनाम्यावरून नाना पटोले असं का म्हणाले?
मुख्यमंत्री रात्री ताफा घेऊन अजित पवारांना भेटायला जातात, राजीनामा लिहून घेतात. राजीनामा आल्यानंतर थेट माध्यमांना सांगतात. पण, नियमानुसार मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला त्याबाबत सांगणं अपेक्षित होतं. त्यामुळे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्याचं अधिवेशन सभागृहात काय होतं, हे पाहता येईल.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नैतिक जबाबदारी म्हणून महायुतीमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा घेतल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून नैतिकता कुठे होती, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यापूर्वीच हत्याप्रकरणाचे फोटो पोहोचले नाहीत का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. तसेच, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर, सकाळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं सांगितलं. मात्र, तांत्रिकदृष्ट्या अद्यापही त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती सभागृहात सांगण्यात आली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
राज्यात एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे महापुरुषांचा अपमान करण्यात येत असल्यावरूनही विरोधक आक्रमक झाले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली होती, औरंगजेब हा उत्तम प्रशासक असल्याचे आझमी यांनी म्हटले होते. तर, प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी देत शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्यानेही सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारला याच मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा लपवता यावा, विरोधकांकडून विचारणा होऊ नये म्हणून आजचं कामकाज बंद पाडण्यात आलं, या सरकारचा निषेध केला पाहिजे. एकीकडे शेतकरी चिंतेत आहे, पीकाला भाव मिळत नाही. सध्या शेतकरी उपाशी आणि सरकार तुपाशी अशी परिस्थिती आहे. आझाद मैदानावर एवढे मोर्चे येत आहेत, सरकारला त्याची काळजी नाही. राज्यात आज जे काही संतापजनक सुरू आहे, पण सरकारने विधानसभा बंद पाडली, आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती थेट माध्यमांना दिली. पण, सभागृहाला दिली नाही. गेल्या अधिवेशनात नागपुरात जे काही बोलले ते खोट होतं, अजून किती लपवणार. गृहखात्याकडे ही माहिती नव्हती का, गृहखात्याने ही माहिती का लपवली, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. संतोष देशमुख प्रकरणात गुन्हेगाराला वाचवण्याचं काम सरकार करत होते, हे सरकार देखील सहआरोपी आहे. या सरकारला हिशोब द्यावा लागणार, असे पटोले यांनी म्हटले.